भाजप, आप ब्रँडच्या उत्पादनांना ऑनलाईन खरेदीत मागणी

निवडणुकीचे वातावरण तापू लागल्याची चिन्हे आता खरेदीवरही दिसू लागली असून भाजप आणि आम आदमी पार्टीच्या नावांने काढण्यात आलेल्या उत्पादनांना ऑनलाईन खरेदीत ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नावाने नमो चहा, टीशर्ट, घड्याळे, मोबाईल, टॅब्लेट,वेदनामुक्ती बाम अशी अनेक उत्पादने बाजारात आणली आहेत तर आम आदमी पक्षाच्या नावानेही घड्याळे, टॅब्लेट, मोबाईल अशा वस्तू बाजारात आणल्या आहेत. ब्ल्यूगेप डॉट कॉम ऑनलाईन स्टोअर्सने राहुल गांधी स्टोअर्स नुकतेच सुरू केले आहे मात्र त्याला अजून म्हणावा तसा प्रतिसाद येताना दिसत नाही.

मोदी ब्रँड म्हणून देशातील २० मोठ्या शहरात ऑनलाईन विक्री सेवा सुरू झाली आहे आणि लवकरच देशभर ही सेवा दिली जाणार आहे. त्यात फ्लीपकार्ट, स्नॅपडील, मायन्ट्रा या कंपन्यांबरोबरच आता ईबे, अॅमेझॉन या ऑनलाईन कंपन्याही सामील होत आहेत. मोदी चहा आणि मोदी बाम ला लोकांकडून सर्वधिक मागणी असल्याचे ही उत्पादने आणणारे प्रकाश उपाध्याय यांचे म्हणणे आहे. स्नॅपडीलने यापूर्वीच स्मार्ट नमो सॅफ्रॉन फोन प्री बुकींग मध्ये विकले आहेत.

आम आदमी पक्षासाठीही घड्याळे, मोबाईल टॅब्लेट बाजारात आले असून त्यांनाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रा गा म्हणजे राहुल गांधी स्टोअर्सना अजून म्हणावा तसा प्रतिसाद नाही मात्र दिल्ली, बंगलोर हिरियानात नमो पेक्षा आप स्टोअर्स विक्रीत पुढे आहेत तर मुंबई, हैद्राबाद, उत्तर प्रदेशातील मोठा भाग येथे नमो स्टोअर्सची चलती असल्याचे सांगितले जात आहे.विशेष म्हणजे आप स्टोअर्सला महिला वर्गाकडून जादा प्रतिसाद मिळत असल्याचेही दिसून आले आहे.