आजारपणातही बाळासाहेबांच्या वाटयाला तेलकट बटाटेवडे – राज ठाकरे

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आजारी असतानाही त्यांच्या वाटयाला ‘मातोश्री’वर ‘दोन तेलकट वडे’ येत होते. एवढया हलाखीच्या स्थितीत बाळासाहेब होते, असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील प्रचारसभेत केला. ही परिस्थिती पाहिल्यानंतर बाळासाहेबांना चिकन सूप घेणार का, याची विचारणा केली होती. त्यांनी होकार दिल्यानंतर कोमात जाईपर्यंत मी पाठवलेले चिकन सूपच ते घेत होते, असे राज यांनी सांगितले. 

आपण पाठीत खंजीर खुपसले, असे उद्धव यांना त्या वेळी कधीच वाटले नाही का, असा सवाल करत राज यांनी उद्धव यांच्यावर हल्लाबोल केला. राज यांनी पाठीत खंजीर खुपसला, असे वक्तव्य उद्धव यांनी केले होते. राज यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. उद्धव आजारी असताना त्यांच्याबरोबर मी होतो. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होईपर्यंत मीच थांबलो होतो. त्यांना घरीही मीच नेले. त्या वेळी खंजीर खुपसणा-याच्या बाजूला का बसायचे, त्या वेळी त्यांना काही वाटले नाही का, त्या वेळी मी कसा चाललो, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. मी पाठीत खंजीर खुपसला आहे, असे बाळासाहेबांनाही कधी वाटले नाही. 

उद्धव आजारी असतानाही त्यांनीच मला बोलावून घेतले होते. त्या वेळी इतर कोणालाही त्यांनी बोलावले नाही. बाळासाहेब आजारी होते. तेव्हा त्यांच्या पुढयात दोन तेलकट वडे ठेवले जात होते. ही त्यांची परिस्थिती पाहवली नाही. त्यानंतर आपण त्यांना रोज चिकन सूप देत होतो. ते रोज माझ्याशी फोनवर बोलत होते, असे राज यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आपल्या या वक्तव्यानंतर इतर कोणाला काही बोलायचे आहे ते बोलावे. २१ तारखेपर्यंत सवाल-जबाब करण्याची आपली तयारी असल्याचा टोलाही त्यांनी उद्धव यांना हाणला. यापुढे राज यांच्या कोणत्याही आरोपांना प्रत्युत्तर देणार नाही, अशी भूमिका उद्धव यांनी घेतली होती. मात्र राज यांनी बुधवारी केलेल्या गौप्यस्फोटानंतर शिवसेनेला यावर बोलावेच लागणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment