
मुंबई- कॅनेडियन वेळापत्रकाच्या निषेधार्थ ३५ तासांपासून संपावर गेलेल्या बेस्टच्या कामगारांनी मुंबईकरांना अक्षरश: वेठीस धरले. या संपाने कडक उन्हाने घामाघूम झालेल्या मुंबईकरांच्या संतापाचा अक्षरश: अंत पाहिला. त्यामुळे मुंबईकरांच्या तीव्र भावना लक्षात घेत राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी बेस्टच्या कामगार संघटनांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. त्यात तोडगा निघाल्यानंतर कामगार नेते शरद राव यांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे संध्याकाळी सातनंतर कर्मचारी कामावर रुजू झाल्याने बेस्ट वाहतूक पूर्ववत झाली. दरम्यान, संपामुळे बेस्टचे दोन दिवसांत सुमारे साडेसहा कोटी रुपयांचे नुकसान झाले.
