खोकल्याच्या औषधाची नशा

एखाद्यावेळी खोकला आल्यामुळे आपण कङ्ग सिरप घेतो. परंतु नकळतपणे दोनच्या ऐवजी चार चमचे सिरप घेतले आणि दिवसातून तीनच्या ऐवजी चार वेळा ते घेतले की नशा येते. वाटल्यास कोणीही हा प्रयोग करून बघू शकतो. कारण या खोकल्याच्या औषधांमध्ये कोडीन सारखे असे काही घटक द्रव्ये आहेत की, ज्यांच्यामुळे माणसाला नशा चढू शकते. आता आता तर ही गोष्ट सर्वांनाच माहीत झालेली आहे आणि शाळा-कॉलेजात जाणारे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खोकल्या च्या औषधांचा वापर नशा आणणार्‍या दारूसारख्या पदार्थासारखा करायला लागल्या आहेत. समाजामध्ये दारू, अङ्गू, गांजा वगैरे मादक पदार्थांच्या मुळे अनेक दुष्परिणाम दिसू लागले आहेत आणि समाजाचे चिंतन करणार्‍यांसाठी तो एक चिंतेचा विषय झाला आहे. त्याच धर्तीवर खोकल्याच्या औषधाची नशा करणारे तरुण हाही एक चिंतेचा विषय होऊन बसला आहे. काही मुले आणि मुली कायम ही औषधे जवळ बाळगायला  लागली असून खोकला असो की नसो पण नित्य नियमाने ही औषधे प्राशन करून गुंगीचा अनुभव घ्यायला लागली आहेत. 

सार्‍या गोष्टी दारूसारख्याच घडायला लागल्या आहेत. दारू पिणारा नशेत राहतो, नशेत जगतो, नित्याच्या कामाकडे दुर्लक्ष करतो आणि वेळीप्रसंगी त्याला दारू मिळाली नाही तर बेचैन होऊन हिंसक सुद्धा बनतो. हे सगळे गुणधर्म कोडीनची नशा करणार्‍या या तरुणांमध्ये सुद्धा दिसायला लागले आहेत. एकट्या मुंबई शहरामध्ये ६० हजार तरुण-तरुणी आणि महिला कोडीनच्या नशेने ग्रस्त झालेल्या आहेत. या औषधाचे एक वैशिष्ट्य असे की, त्याने नशा तर येते पण तोंडाला वास येत नाही आणि आपण अशी एक नशा करत आहोत हे कोणालाही कळत नाही. दारूपेक्षा कोडीन त्या दृष्टीने सोपे आणि सुरक्षित आहे. परंतु शेवटी कोणताही नशिला पदार्थ शरीराच्या विविध अवयवांवर आपल्या काही ना काही खुणा सोडून जात असतो. तसेच कोडीनच्या बाबतीत होते. पण या संदर्भात कोडीनचा एक विशेष असा की, कोडीनचे दुष्परिणाम दारूपेक्षा सुद्धा वाईट आहे. 

कोडीनमुळे त्या व्यक्तीच्या मेंदूवर गंभीर परिणाम होतात. हे माहीत असून सुद्धा कोडीनग्रस्त लोक वरचेवर त्याचे सेवन करत राहतात. एखाद्या दारूच्या दुकानात जाऊन दारूची बाटली खरेदी करण्यापेक्षा औषधाच्या दुकानात जाऊन खोकल्याचे औषध खरेदी करणे सोपे असते. त्यात काही लाज वाटण्याचे कारण नाही. परंतु औषधाचे दुकानदार आता सावध झालेले आहेत. एखादा मुलगा किंवा गृहिणी वारंवार खोकल्याचे औषध मागायला लागली की दुकानदार ही औषधाची मागणी औषध म्हणून नसून ती नशा करण्यासाठी आहे हे ओळखायला लागले आहेत. मुंबईमध्ये अनेक दुकानदारांनी या औषधाची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू केलेली आहे. मात्र डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही औषधे देणे बेकायदा असल्यामुळे मुंबईतल्या ४० दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत.