भन्नाट केजरीवाल

अरविंद केजरीवाल भन्नाट बोलतात. आता ते जनतेची मोठीच करमणूक करीत आहेत. तिचा लाभ जनतेने घेतला पाहिजे अन्यथा येत्या दोन तीन वर्षात ते इतिहासजमा होतील आणि राजकारणात कोठेही दिसणार नाहीत. त्यांची भन्नाट भाषणे ऐकायची संधी पुन्हा लोकांना मिळणार नाही.  तेव्हा आताच त्यांचा लाभ घेतला पाहिजे. निवडणुकीत गंभीर चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. ती ठीकच आहे पण तसे झाल्यास निवडणूक अगदीच रुक्ष होईल म्हणून अरविंद केजरीवाल  हे निवडणूक प्रचार अधिक रसदार व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. अतिशयोक्ती या रसाने लोकांची फार करमणूक होत असते.  म्हणून केजरीवाल या रसाची बरसात करायला सज्ज झाले आहेत. मुळात केजरीवाल यांनी राजकारणात प्रवेश केला हीच एक अतिशयोक्ती आहे पण आता त्यावर कडी करून ते आपली तुलना प्रभू रामचंद्रांशी करायला लागले आहेत. मोदी यांच्या वाराणसीतल्या समर्थकांनी मोदींची तुलना महादेवाशी केली.  पण आता त्यावर कडी करून अरविंद केजरीवाल यांनी स्वत:च आपली तुलना प्रभु रामचंद्रांशी केली. 

रामाने सत्ता त्यागून वनवासाला जाणे पसंत केले तसे आपण ४९ दिवसांची सत्ता सोडून वनवासाला गेलो आहोत असे केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांनी केवळ ४९ दिवसातच गाशा गुंडाळून सत्ता सोडून दिली. आता त्यांना लोकांतून प्रश्‍न विचारले जात आहेत.  हातात आलेली सत्ता राबवता येत नाही मग केन्द्रातली सत्ता कशाला मागता असा सवाल  केला जात आहे. तेव्हा आता आपण कोणाच्या तरी छळाला कंटाळून श्रीरामाप्रमाणे वनवासाला गेलो आहोत. आपण काही पळून गेलो नाही असा त्यांचा युक्तिवाद आहे. राम काही वनवासात पळून गेला नव्हता. पण त्या काळात भाजपाचे नेते असते तर त्यांनी राम पळाला असल्याचा आरडा ओरडा केला असता अशी पुस्तीही त्यांनी जोडली. खरे तर रामाचे वनवासाला जाणे आणि केजरीवाल यांचे सत्ता सोडून पळून जाणे यांचा विरोधी तुलना करण्याइतकाही संंबंध नाही. या दोन घटनांत केवळ सत्ता सोडणे एवढी एकच गोष्ट समान आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल आपल्या मूर्खपणाची तुलना रामाच्या वनवासाशी करीत असतील तर केजरीवाल यांचीच अक्कल वनवासाला गेलीय असे म्हणावे लागेल. श्रीरामाला कैकयीच्या हट्टासाठी सत्ताग्रहणाच्या आधीच वनवासाला जावे लागले होते. रामाने सत्ता मुळी हाती घेतलीच नव्हती. केजरीवाल यांनी सत्ता हाती घेतली होती आणि त्यांना कोणत्याही कैकेयीने सत्ता सोडायला सांगितले नव्हते. 

या दोन घटनांत एक फरक आहे. रामाचे राज्यारोहण हे वैध होते. त्या काळात रूढ असलेल्या नियमांनुसार रामाला दशरथाचा ज्येष्ठ पुत्र म्हणून राज्याभिषेक होणार होता. रामाने अवैध मार्गाने सत्तेवर हक्क सांगितलेला नव्हता. आणि वैध मार्गाने हाती येतात असतानाही ती वडिलांचे आज्ञा मानून त्यागली होती. केजरीवाल यांनी मात्र  अवैध मार्गाने सत्ता मिळवली. त्यांनी ज्यांना रावण ठरवले होते. त्यांच्याच पाठींब्याने सत्ता मिळवली होती. रामाने आपल्या आयुष्यात कधीही सत्ता ग्रहण करणार नाही अशी प्रतिज्ञा केली नव्हती पण त्याला  वारसा हक्काने ती वैध मार्गाने मिळणार होती. पण केजरीवाल यांची वाटचाल त्याच्या नेमकी उलट आहे. त्यांनी सत्ता मिळवण्याच्या भानगडीत पडणार नाही अशी अनेकदा जाहीर प्रतिज्ञा केली असूनही सत्तेची खुर्ची दिसताच त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. सत्ता हाती घेणार नाही अशी प्रतिज्ञा करूनही केजरीवाल तत्त्वांना मुरड घालून त्यांनी ज्यांना रावण ठरवले होते त्यांच्याच गळ्यात गळे घालायला गेले. केवळ सत्तेसाठी. राम एकवचनी होता पण केजरीवाल एकही वचन धड पाळत नाहीत. बरे अनैतिक मार्गाने सत्ता हस्तगत केली तरीही त्यांना ती झेपली नाही पण याबाबत ते खरे बोलत नाहीत. 

राम सत्यवचनी होता. केजरीवाल कधीच सत्य बोलत नाहीत. त्यांनी हातातली सत्ता सोडावी म्हणून भाजपा आणि कॉंग्रेस या दोन पक्षांनी मिळून कारस्थाने केली असा आरोप ते करतात. पण या देशात भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यात किती मतभेद आहेत हे सर्वांना माहीत आहे. अशा स्थितीत भाजपा आणि कॉंग्रेसचे नेते एकत्र आले असे कोणी म्हटले तर या काळातले यापेक्षा वेगळे असत्य काही असणार नाही. केजरीवाल मात्र आपल्या विरोधात भाजपा आणि कॉंग्रेसचे नेते एकदिलाने काम करतात अशी थाप ठोकून देतात. तिच्यावर कोणी विश्‍वास ठेवणार नाही. रामाने सीतेला सोडवून आणले आणि घरात घेताना अग्निपरीक्षेतून ती शुद्ध आहे हे जनतेला दाखवून दिले. तरीही एका सामान्य माणसाला ते पटले नाही. अग्निपरीक्षा झाली असूनही त्याने सीतेच्या चारित्र्याविषयी आक्षेप नोंदवलाच. तोही जाहीरपणाने नाही तर खाजगीत. अशा नागरिकाचा काटा काढणे रामाला शक्य होते पण त्याची हरकत लक्षात घेऊन रामाने सीतेचा त्याग केला. आता केजरीवाल यांच्या पळपुटेपणावर अनेक लोक जाहीरपणे बोलत आहेत. त्यांच्या पळपुटेपणाचा निषेध म्हणून त्यांच्या अंगावर शाई, अंडी फेकत आहेत. पण तरीही केजरीवाल आपल्या वर्तनात काही चूक झालीय हे मानायला तयार नाहीत आणि राजकारणाच्या या डबक्यात आपली नवी घाण मिसळण्यापासून दूर जायला तयार नाहीत.

Leave a Comment