सान्तियाहो – दक्षिण अमेरिकेतील चिली या देशाला मंगळवारी रात्री आठ रिश्चर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसून त्सुनामी लाटा उसळल्या. चिलीच्या उत्तर भागाला या भूकंपाचा आणि त्सुनामी लाटांचा धक्का बसला. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर ४५ मिनिटांची त्सुनामी लाटा आल्या, अशी माहिती चिलीच्या नौदलाच्या अधिकार्यांनी दिली आहे.
या भूकंपाचा परिणाम होऊन अमेरिकेच्या प्रशांत महासागराला लगत असलेल्या भागात अजूनही त्सुनामी लाटा उसळण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेच्या हवामान खात्याने म्हटले आहे. चिलीच्या समुद्र किनार्यावर झालेल्या भूकंपाचा मध्यबिंदू समुद्राच्या आत होता, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
भूकंप झालेला चिलीचा भाग पेरू या देशाशी लगत आहे, त्यामुळे भूकंपाचे आणि त्सुनामी लाटांचे परिणाम पेरूमध्ये सुद्धा जाणवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चिलीमधील इक्विक या बंदराला भूकंपाने मोठे नुकसान सहन करावे लागले आहे, शिवाय कोलंबिया, इक्वेडोर, पनामा, कोस्टारिका आणि निकाराग्वा याही देशांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यापूर्वी २०१० साली अशाच प्रकारे ८.८ रिश्चर क्षमतेचा भूकंप होऊन त्सुनामी लाटा उसळल्या होत्या आणि त्यावेळी शेकडो लोक मरण पावले होते. त्या व्यतिरिक्त काही शहरांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.