बेस्टच्या अचानक संपाने लाखो मुंबईकर वेठीस

मुंबई- मंगळवारी सकाळीच मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या कर्मचार्‍यांनी अचानक संप पुकारल्याने कार्यालयात जाणारे कर्मचारी, परिक्षेसाठी जाणारे विद्याथी व अन्य प्रवाशांचे अतोनात हाल झाले. बस बंद राहिल्याने रिक्षा टॅक्सीसाठी एकच गर्दी उसळल्याने या गोंधळात अधिकच भर पडल्याचे वृत्त आहे. नवीन संगणकीकरण पद्धतीला विरोध करण्यासाठी कांही युनियननी अचानक हा संप पुकारला असल्याचे समजते. शहरातील २५ डेपोमध्ये सुमारे ३५०० बसेस उभ्या केल्या गेल्या आहेत.

बेस्टचे आयुक्त ओमप्रकाश गुप्ता या संदर्भात म्हणाले की बेस्टने अमलात आणलेली नवी संगणक पद्धती सर्व कर्मचार्‍यांना मान्य नाही.४० टक्के कर्मचार्‍यांनी ती मान्य केली आहे. या नव्या पद्धतीमुळे चालक वाहकांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहेच पण त्यामुळे बसची फ्रिक्वेन्सी वाढण्यासही हातभार लागणार आहे. शिवाय बेस्टचे यामुळे दरवर्षाला ३२ कोटी रूपये वाचणार आहेत.

नवीन पद्धतीला विरोध करण्यासाठी केलेल्या हुल्लडबाजीमुळे ११ जणांना बेस्टने निलंबित केले आहे. त्यांना परत कामावर घ्यावे आणि नवीन पद्धतीतील जाचक नियम काढून टाकावेत यासाठी कांही युनियननी आज सकाळी अचानक संप पुकारला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर दररोज ४२०० बेस्टच्या बसेस धावतात. त्यातील २०० एसी बसेस आहेत. २२ हजार चालक वाहक येथे काम करतात आणि दररोज ५०० मार्गांवर या बसेस प्रवाशांची ने आण करत असतात.

Leave a Comment