निवडणूक जाहिरातींमुळे टिव्ही चॅनल्सची चांदी

मुंबई – एप्रिलपासून सुरू होत असलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांची धामधूम आता ऐन रंगात आली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार वेग पकडू लागला आहे. यामुळे टीव्ही चॅनल्सना हात धुवून घेण्याची चांगली संधी उपलब्ध झाली असून यंदाच्या निवडणुकींत किमान १५० कोटी रूपयांचा महसूल केवळ जाहिरातीतून हे चॅनल्स मिळविणार आहेत. त्यात अर्थातच भाजप आणि काँग्रेस पक्षाचा हिस्सा अधिक राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार छोट्या राजकीय पक्षांनी जाहिरातींसाठी प्रादेशिक वाहिन्यांना अधिक प्राधान्य दिले आहे. आजपर्यंत मोठे पक्ष जाहिरातींसाठी न्यूज चॅनलचा वापर सर्वाधिक करत असत मात्र यंदा स्पोर्टस आणि मनोरंजन वाहिन्यांवरही त्यांनी जादा लक्ष पुरविले आहे कारण या वाहिन्या पाहणार्‍या नागरिकांची संख्या न्यूज चॅनल पाहणार्‍यांच्या तुलनेत खूपच अधिक आहे.

राजकीय पक्षांनी यंदा क्रिकेट चॅनल्सबरोबरच चित्रपट वाहिन्यांनाही पसंती दिलेली दिसून येत आहे. सध्या झालेल्या जाहिरातीसाठीच्या बुकींगप्रमाणे निवडणुक काळात किमान १५० कोटीं जाहिरातीवर खर्च केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे मात्र अजूनही यात वाढ होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

Leave a Comment