करवीरनगरीतूनही दोन्ही काँग्रेस बाहेरच रहाण्याची चिन्हं

कोल्हापूर जिल्हा हा साखर कारखान्यांचा जिल्हा. काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पण त्याला गेल्या काही वर्षात तडे गेल्याचे चित्र बघायला मिळाले. आर्थिक दृष्ट्या समृद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यावर शरद पवार यांनी स्वताचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण येथील सूज्ञ मतदारांनी तो कधीच यशस्वी होऊन दिलेला नाही. मागच्या निवडणुकीप्रमाणेच यावेळी करवीरनगरीतून दोन्ही काँग्रेस बाहेरच रहाण्याची चिन्हं दिसत आहेत.

काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडीत कोल्हापूरच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीने घेतल्याने तेथील जुने काँग्रेसजन चिडून आहेत. मागच्या निवडणुकीत सुदाम मंडलिक यांना उमेदवारी नाकारली होती त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करून निवडणूक जिंकली अन राष्ट्रवादीला दणका दिला.

यावेळी सुदाम मंडलिक हे कोणाकडे तिकीट मागण्याच्या फंदात पडलेच नाहीत. त्यांनी सरळसरळ त्यांचा मुलगा संजय मंडलिक याच्यासाठी शिवसेनेचे तिकीट आणले आहे. त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार महादेव महाडिक याचा मुलगा मुन्ना महाडिक याला तिकीट दिले. मुन्ना महाडिक यांची उमेदवारी राष्ट्रवादीने यादीतून जाहीर न करता सोलापूरमधून त्यांची उमेदवारी जाहीर करण्याची नामुष्की शरद पवार यांच्यावर आली.
असाच दणका हातकलंगणे मतदारसंघात राष्ट्रवादीला मिळाला. पण तेथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याबाजूने शेतक-यांनी कौल दिला अन शेतक-यांचे नेते जाणता राजाला धक्का दिला. त्यावेळी मतदारांनी केवळ मतांचीच नाही तर निवडणूक लढवण्यसाठी पैशाचीही ताकद राजू शेट्टी यांना दिली. ही निवडून अवघ्या पावणेचार लाख रूपये खर्चात राजू शेट्टी यांनी जिंकली.

या निवडणुकीत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने जयंत पाटील यांना उतरवण्याचा प्रयत्न केला पण पाटील यांच्या नकार काकापुतणे होकारात बदलू शकले नाहीत. त्यांनी तुल्यबळ उमेदवार शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या गळाला कोणीच लागले नाही. त्यामुळे अखेर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडून देण्याची नामुष्की शरद पवार यांच्यावर आली.

यावेळी मत विभाजनासाठी शरद पवार यांनी जैन समाजातील कल्लप्णा आवाडे यांना वयाच्या 82 व्या वर्षी रिंगणात उतवण्याची खेळी केली आहे. राजू शेट्टी हे जैन असल्याने मत विभाजन होऊन त्यांना पराभूत करता येईल असा त्यांचा डाव आहे. पण गेली पाच वर्षे शेट्टी हे शेतक-यांसाठी सातत्याने संघर्ष करत आहेत. त्यामुळे यावेळीही त्यांच्या मागे पुन्हा एकदा पैशाची ताकद जशी आज मतदार उभी करत आहेत तशीच मतांचीही ताकद उभी करतील असे चित्र आहे. त्यामुळे यावेळीही दोन्ही काँग्रेस करवीरनगरीच्या वेशीबाहेरच रहाणार असल्याचे दिसते.