सन 2019 पर्यंत राजकीय पक्षपद्धती संपवणार – अण्णा हजारे

नगर- ’देशभरात फोफावलेला भ्रष्टाचार, संसदेत आणि संसदेबाहेर होणार्‍या लोकप्रतिनिधींच्या मारामार्‍या आणि झुंडशाहीला पक्षीय राजकारण जबाबदार असून खर्‍या अर्थाने लोकशाही आणण्यासाठी प्रथम राजकीय पक्षपद्धती मोडीत काढणे आवश्यक आहे. यापुढे आपली लढाई राजकीय पक्षांच्या विरोधात असणार आहे. त्यासाठी नवीन देशव्यापी संघटना स्थापन करणार असून निवडणुकीनंतर तिचे नाव जाहीर करण्यात येईल; अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांंच्या ब्लॉगवर देण्यात आली आहे.

पक्षीय राजकारणाला आपला विरोधच आहे, मात्र आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ही जुनी पद्धत मोडून काढणे अशक्य आहे. मात्र शक्यतो सन 2019 पर्यंत आणि ते न जमल्यास सन 2024 च्या निवडणुकीपर्यंत पक्षीय पद्धत संपविण्याचे अण्णांच्या नव्या संघटनेचे उद्दीष्ट आहे. देशातील 600 जिल्ह्यांत ही संघटना कार्यरत असणार आहे. या विचाराचा देशभर प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अण्णा काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्राही करणार आहेत. उपोषण आणि आंदोलने करून सरकारवर दवाव आणण्याऐवजी जनजागृतीद्वारे करून जनसमर्थन आपल्या विचाराचा प्रसार करण्याचे अण्णांचे धोरण असणार आहे.

महात्मा गांधी यांचाही पक्षीय निवडणुकांना विरोध होता. मात्र, सन 1952 पासून आजतागायत पक्षीय पद्धतीनेच निवडणुका होत आहेत. हा प्रकार घटनाबाह्य असून संसद पक्षांची झाल्याने पक्षांमध्ये खालच्या पातळीवर जाऊन स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली जाऊ लागली आहे. सत्तेच्या मोहामुळे पक्ष किंवा सध्याचे सरकारही ही पद्धत बंद करण्यास तयार नाही, त्यामुळे जनेतेच पुढाकार घेऊन ही पद्धत मोडून काढली पाहिजे. पुढील दहा वर्षांत या देशातील पक्ष आणि पार्ट्यांची पद्धत नेस्तनाबूत करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई समजण्यात यावी; असा उल्लेख अण्णा हजारे यांच्या ब्लॉगवर करण्यात आला आहे.

Leave a Comment