विशेष प्रतिनिधी – महाराष्ट्रात यंदा लोकसभेच्या निवडणुकीत बहुतेक सर्वच राजकीय पक्षांकडून घरातच राजकीय वासरा लाभलेल्या वारसदारांना उतरवण्यात आले आहे. यापैकी काहीजण मागच्या निवडणुकीपासूनच यात आले आहेत तर यंदा काहीजणांनी प्रथमच प्रवेश केलेला आहे. महाराष्ट्रात असलेल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 24 मतदारसंघ हे राजकीय नेत्यांच्या वारसांनीच बळकवले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजकीय वारसदारांच्या लोकसभेच्या यादीत सर्वात ज्येष्ठ काँग्रेसचे मुकूल वासिनक, प्रिया दत्त आणि सेनेचे भावना गवळी आहेत. त्यानंतर प्रतिक पाटील, मिलिंद देवरा, संजय दिना पाटील, संजीव नाईक, आनंद परांजपे, नितेश राणे, सुप्रिया सुळे असे नंबर लागतात. मागच्या निवडणुकीत जिंकलेले समीर भुजबळ यांना पुन्हा उमेदवारी मिळालेली नाही.
या शिवाय पूमन महाजन, माजी आदिवासी मंत्री डॉ. विजय गावित यांच्या कन्या डॉ. हिना गावित आणि एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे भाजपकडून प्रथमच निवडणूक लढवत आहेत. ठाण्याचे जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे, कोल्हापूरचे माजी खासदार सदाशिव मंडलिक यांच्या मुलाला संजय मंडलिक यांना सेनेने उमेदवारी दिली आहे.
कोल्हापूरमधून आमदार महादेव महाडिक यांचे चिरंजीव मुन्ना महाडिक, आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनित राणा, रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर, आमदान ए. टी. पवार यांच्या सूनबाई डॉ. भारती पवार, राजीव राजळे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. यापैकी राणा आणि नार्वेकर यांवी उमेदवारी वादग्रस्त ठरली आहे.
काँग्रेसनेही अशोक चव्हाण, डॉ. विश्वजीत कदम, राजीव सातव, सागर मेघे, नितीन पाटील, विजय औताडे या राजकारणाचा वारसा असलेल्या घरातील उमेदवारांना तिकीटे दिली आहेत. अशा या घराणेशाहीतील वारसांनी राज्यातील निम्मे म्हणजे 24 मतदारसंघ बळकावले आहेत.