यंत्रणा मोठी पण तेवढीच विस्कळीत असल्याचा काँग्रेस उमेदवाराला त्रास

विशेष प्रतिनिधी – पुणे शहर लोकसभेची उमेदवारी डॉ. विश्वजीत कदम यांना मिळाली. त्यानंतर डॉ. पतंगराव कदम यांनी ही निवडणूक जिंकण्याच्या हेतून प्रचंड मनुष्यबळ पुण्यात आणले आहे. मतदारसंघातील प्रत्येक बूथवर त्यांनी त्यांची पाचसात माणसे नेमली आहेत. सध्या पुण्यात भारती विद्यापीठ आणि सांगली जिल्ह्यातील एकूण सुमारे तीन हजार माणसे कदम यांच्यासाठी काम करत आहेत. ही यंत्रणा मोठी दिसत असली तरी त्यात तेवढाच विस्कळीत पणा असल्याने ती उमेदवाराला त्रासदायकही ठरत आहे.

भारती विद्यापीठ आणि सांगलीतील मनुष्यबळा शिवाय पुण्यातील काँग्रेसची यंत्रणाही जोडीला आहेच. पण दोन्ही यंत्रणांमध्ये ताळमेळच नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले. माघारीची मुदत संपून ख-या अर्थाने निवडणूक सुरू झाली आहे. या काळात डॉ. विश्वजीत कदम यांनी जीपयात्रांव्दारे सहा मतदारसंघात एक फेरी पूर्ण केली आहे.

एकीकडे प्रचार चांगला सुरू असला तरी उमेदवाराचे ठरलेले कार्यक्रम तांत्रिक कारणांमुळे रद्द होण्याच्याही घटना घडत आहेत. एके ठिकाणी पदयात्रेसाठी उमेदवार गेले पण त्याची पोलिस परवानगीच नसल्याने ती पदयात्राच रद्द करण्याची नामुष्की काँग्रेसवर आली. आतापर्यंतच्या कार्यक्रमात उमेदवाराचे वेळेच नियोजन व्यवस्थित न झाल्याने त्यांच्याकडे दिवसातील सकाळ किंवा संध्याकाळचा वेळ मोकळा राहिला होता असेही घडले आहे.

असे मोकळा वेळ राहिल्यानंतर दुस-या दिवशी कार्यक्रमांची रेलचेल केली जात असल्याचे दिसून आले. काल सकाळचा वेळ मोकळा राहिला पण संध्याकाळी पदयात्रा, जाहीर सभा, महिला मेळावा आणि आजीमाजी नगरसेवकांचा मेळावा असे भरगच्च कार्यक्रम उमेदवारांना देण्यात आले होते. त्यामुळे उमेदवार कसब्यातून गंजपेठेत आणि गंजपेठेतून वडगावशेरी आणि तेथून परत काँग्रेसभवन असे दुपारी चारनंतर फिरत राहिले.

त्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत उमेदवाराच्या पदयात्रेत फिरणे आणि पुढे सभांना गर्दी करण्याशिवाय काहीच काम उरले नसल्याचे कार्यकर्तेच बोलून दाखवत आहेत. त्यामुळे बूथ निहाय नेमण्यात आलेल्या माणसांचा आणि कार्यकर्त्यांचा अद्याप ताळमेळच बसलेला नसल्याचे काही कार्यकर्त्यांनीच सांगितले.