महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुसाळकर पुरस्कार प्रदीप चंपानेरकर यांना

पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद आणि बनहट्टी कुटूंबिय यांच्यावतीने उकृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी देण्यात येणारा “पुष्पा पुसाळकर पुरस्कार’ “असा घडला भारत (1947-2012)’ या पुस्तकासाठी रोहन प्रकाशनच्यावतीने प्रदीप चंपानेरकर यांनाराजेंद्र बनहट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

याप्रसंगी मसापच्या कार्याध्यक्षा डॉ.माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाहक प्रकाश पायगुडे, सुविचार प्रकाशनचे चैतन्य बनहट्टी आणि रोहन चंपानेरकर आदी उपस्थित होते. 

पुरस्काराला उत्तर देताना चंपानेरकर म्हणाले, पुस्तकाच्या निर्मितीमागे एक उद्देश असतो. त्याची मांडणी, लेआऊट, मुद्रण आदीं विषयी संकल्पना स्पष्ट असाव्या लागतात. पुस्तकाची रचना ही मजकुराचे महत्व वाढवणारी असावी. “असा घडला भारात…’ या पुस्तकाची मांडणी म्हणजे मोठे आव्हान होते. तब्बल सात वर्ष या पुस्तकावर निर्मितीपूर्व काम चालू होते. पूर्णपणे व्यावसायीक दृष्टीकोन बाजूला ठेवून केलेल्या सांघीक कार्याची ही फलश्रुती आहे. 

बनहट्टी म्हणाले, प्रकाशक उत्कृष्ट पुस्तकांची निर्मिती करतात. परंतु, ती वाचकांपर्यंत पोहचत नाहीत, याची खंत वाटते. “असा घडला भारत (1947-2012)’ या पुस्तकात भारताचे राजकारण, सामाजकारण, विज्ञान-तंत्रज्ञान, क्रिडा, संस्कृती आदी क्षेत्राचा मागोवा घेण्यात आला आहे. या पुस्तकाचे संपादन सुहास कुलकर्णी आणि मिलिंद चंपानेरकर यांनी केले आहे. तर ग्रंथाचे स्वरुप व रचना प्रदिप चंपानेरकर यांनी केली आहे.