भारताचा सलग चौथा विजय

ढाका- ऑस्ट्रेलियावर ७३ धावांनी मात करत भारताने आयसीसी टी-२० विश्वचषक सामन्यात  ‘ग्रुप २’ मध्ये रविवारी सलग चौथा विजय मिळवला. भारताच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १६.२ षटकांत ८६ धावांत संपला. ऑफस्पिनर आर. अश्विनने चार गडी बाद करुन विजयात मोलाचा वाटा उचलला. तत्पूर्वी, अष्टपैलू युवराज सिंगमुळे (४३ चेंडूंत ६० धावा) भारताला दीडशेपार धावा करता आल्या. गटवार साखळीत चारही सामने जिंकणारा भारत एकमेव संघ आहे. 

भारताने यापूर्वीच उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. भारतातर्फे सलामीला आलेल्या रोहित शर्माला अवघ्या पाच धावांवर बाद करुन ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ब्रॅड हॉज याने भारताला पहिला धक्का दिला. रोहितचा जेम्स मुईरहेड याने झेल घेतला. त्यापाठोपाठ विराट कोहली २३ धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणेही १९ धावांवर बाद झाला. तर सुरेश रैनाही अवघ्या सहा धावांवर बाद झाला. तर कर्णधार महेंद्रसिंग ढोणी याने ही अवघ्या २४ धावा केल्या. दुस-या बाजूला खंबीरपणे एक बाजू लढवणा-या युवराज सिंगला शेन वॉटसनने आरोन फिंटकडे झेल देऊन बाद केले. युवराजने ४३ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकार मारुन ६० धावा केल्या. 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. या स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीने प्रथमच नाणेफेक गमावली. धोनीने या लढतीत शिखर धवनला विश्रांती देऊन त्याच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी दिली. मात्र, या जोडीलाही दमदार सलामी देण्यात अपयश आले. डावाच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा बाद झाला. यानंतर रहाणे -विराट कोहलीने मोर्चा सांभाळला. मात्र, या जोडीला मोठी खेळी करण्यात अपयश आले. कोहली -रहाणे एकापाठोपाठ बाद झाल्यानंतर सुरेश रैनाकडून अपेक्षा होती. मात्र, रैनानेही निराशा केली. रैना बाद झाल्यानंतर भारताची ११.३ षटकांत ४ बाद ६६ अशी स्थिती झाली होती. 

स्पर्धेत प्रथमच भारतीय फलंदाज गडबडल्यासारखे वाटत होते. यानंतर फॉर्मासाठी झगडत असलेल्या युवराजसिंगने कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या साथीने धावगती वाढवली. या जोडीने ४२ चेंडूंत ८४ धावांची भागीदारी रचली. १९व्या षटकात मिचेल स्टार्कने धोनीचा त्रिफळा उडवून ही भागीदारी संपुष्टात आणली. अखेरच्या षटकात युवराजसिंग आणि रवींद्र जडेजाही बाद झाला. शेवटच्या बारा चेंडूंत भारताकडून फटकेबाजी बघायला मिळाली नाही. त्यामुळे भारताने निर्धारित २० षटकांत ७ बाद १५९ धावा फलकावर लावल्या. युवराजसिंगने ४३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६० धावा केल्या. त्याचे हे आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील आठवे अर्धशतक ठरले.

Leave a Comment