फेसबुक, गुगलची निवडणूक जाहिरातींवर नजर

यंदाच्या निवडणुकांत सोशल मिडीयाचा वापर सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. त्यासाठी अंदाजे ५०० कोटी रूपये खर्च केले जातील असे अनुमान आहे. या खर्चातील मोठा वाटा आपल्याकडे यावा म्हणून फेसबुक, गुगल, ट्वीटर या सोशल मडिया क्षेत्रातील कंपन्या जोरदार प्रयत्न करत आहेत.

यंदाच्या निवडणुकीत ८१.४० कोटी मतदार मतदानास पात्र आहेत. त्यातील २० कोटी इंटरनेट युजर आहेत. व सुमारे १० कोटी फेसबुक, ट्वीटरचे युजर आहेत. तज्ञांच्या मते प्रथमच मतदान करणारे १० कोटी मतदार सोशल साईटवर अॅक्टीव्ह आहेत. आणि बहुसंख्य राजकीय पक्षांचे ते मुख्य टार्गेट आहेत. निवडणूक जाहिराती आणि प्रचाराचा एकूण खर्च ४ ते ५ हजार कोटींच्या दरम्यान असणार आहे त्यातील किमान ५०० कोटी सोशल मिडियासाठी खर्च होतील.

दिल्ली विधानसभा निवडणुकांत आम आदमी पार्टीने सोशल मिडियाचा ऑनलाईन प्रचारासाठी अतिशय उत्तम प्रकारे करून घेतला होता हा इतिहास ताजा आहे. त्यामुळे बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष या नव्या तंत्राकडे वळविले आहे. लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी १६० जागा अशा आहेत की जेथे सोशल मिडियाचा प्रभाव चांगला पडू शकतो आणि त्या निर्णायक ठरू शकतात.

राजकीय पक्षांमध्ये इंटरनेटने स्वतःचे स्थान नक्कीच निर्माण केले आहे आणि ऑनलाईन प्रचारासाठी प्रत्येक उमेदवार आपल्या एकूण खर्चाच्या किमान ५ ते १० टक्के रककम खर्च करेल अशी अपेक्षा गुगलचे भारतातील प्रमुख गौरव कपूर यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक प्रचारात प्रवासात जाणारा वेळ व सभांमध्ये जाणारा वेळ लक्षात घेता ऑनलाईन प्रचार अधिक वेगवान आणि कोणत्याही भागात होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. कांही पक्षांनी सदस्य नोंदणीसाठी ऑनलाईन सेवेचा वापर यापूर्वीच सुरू केला आहे.

Leave a Comment