इस्लामाबाद/ वृत्तसंस्था – आपल्या सत्तेबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला असता आणीबाणी जाहीर करून खुर्ची टिकविण्याच्या कृत्याबद्दल पाकिस्तानातील तीन न्यायमूर्तींच्या विशेष खंडपीठाने पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आणि लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना आरोपी ठरविले आहे. त्यांच्यावर देशाशी गद्दारी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुशर्रफ यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
लष्कराच्या सहाय्याने बंड करून पाकिस्तानची सत्ता हस्तगत केलेले मुशर्रफ यांच्या सत्ताग्रहणानंतर त्यांच्या वैधतेबाबत कायदेशीर आक्षेप घेण्यात आला. आपल्या खुर्चीला धोका निर्माण झाल्याचे पाहून देशात प्रथमच आणीबाणी जाहीर करून सत्ता टिकविण्याचा प्रयत्न मुशर्रफ यांनी सन २००७ मध्ये केला होता. त्यांच्या या कृत्याची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने विशेष खंडपीठाची स्थापना केली आहे. या खंडपीठाने मुशर्रफ यांना दोषी ठरविले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीला जीवाला धोका असल्याचे अथवा आजारपणाचे कारण देत मुशर्रफ बहुतेक वेळा अनुपस्थित राहिले आहेत.
आपण पाकिस्तानी न्यायव्यवस्थेचा आदर करतो. त्याबाबत कोणताही व्यक्तिगत अहंकार आपल्या मनात नाही. या वर्षात तब्बल १६ वेळा आपण इस्लामाबाद, कराची आणि रावळपिंडी या ठिकाणी न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित राहिलो. आपण सलग नऊ वर्ष पाकिस्तानी सैन्याचे नेतृत्व केले आहे. पाकिस्तानी सैन्यात सलग ४५ वर्ष देशाची सेवा केली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला देशद्रोही, गद्दार कसे ठरविले जाते; असा सवाल मुशर्रफ यांनी खंडपीठासमोर केला.