बॉडीक्लॉक दुरुस्त करणारे औषध

माणूस सकाळी जन्मतो की संध्याकाळी यावर त्याचे पूर्ण आरोग्य अवलंबून असते. कारण या वेळेवरच त्याचे बॉडीक्लॉक निश्‍चित झालेले असते. अलीकडच्या काळात बॉडीक्लॉकची कल्पना वैद्यक शास्त्रात मान्यताप्राप्त झाली आहे. काही लोकांची कार्यक्षमता सकाळी चांगली असते. याउलट काही लोकांना सकाळी ङ्गार कंटाळा येतो आणि ते लोक रात्री मात्र उत्साहाने न थकता काम करतात. एका व्यक्तीला सकाळ चांगली वाटते तर दुसरीला संध्याकाळ. यामागे त्यांच्या बॉडीक्लॉकचे कारण असते. ज्याच्या त्याच्या बॉडीक्लॉकनुसार काम करायला मिळाले तर तो चांगले काम करू शकतो. मात्र त्याच्या कामाच्या वेळा बॉडीक्लॉकशी विसंगत असतील तर त्याची कार्यक्षमता तर घटतेच, पण अशा विसंगतवेळी काम करायला लावल्यामुळे त्याचे आरोग्यही बिघडते. आरोग्याच्या बिघाडाची कारणे शोधताना आता काही डॉक्टर बॉडीक्लॉकला महत्व द्यायला लागले आहेत. 

काही लोकांची प्रकृती बिघडते. या बिघाडामध्ये कसलेच कारण सापडत नाही. मात्र त्याचे बॉडीक्लॉक बिघडले आहे काय, या दिशेने तपास केल्यास प्रकृती बिघडण्याचे कारण सापडू शकते. हे लक्षात आल्यावर शास्त्रज्ञांनी माणसाच्या शरीरातील बॉडीक्लॉकचे नियंत्रण करणारे जनुक शोधून काढले आहे. या जनुकाचा आधार घेऊन ऑस्ट्रेलियातल्या काही शास्त्रज्ञांनी अशी औषधे शोधून काढली आहेत की औषधे माणसाच्या शरीरातील बिघडलेले बॉडीक्लॉक सुरळीत होऊ शकते. बॉडीक्लॉक बिघडल्यामुळे जाडी वाढते, मधुमेह होतो. असे विकार इतरही अनेक कारणांनी होतात, परंतु बॉडीक्लॉकमधला बिघाड हेही एक महत्वाचे कारण असल्याचे दिसून आले आहे. 

बॉडीक्लॉक बिघडले की, झोपेच्या वेळा बदलतात. त्या बदलल्या की शरीर पुरती विश्रांती घेऊ शकत नाही आणि दिवसभर अस्वस्थ राहते. अशा अस्वस्थ अवस्थेतूनच शरीरामध्ये अनेक बिघाड व्हायला लागतात आणि सर्वात मोठा बिघाड म्हणजे शरीर आपल्या अन्नातील पोषक द्रवे शोषून घेऊ शकत नाही. उदा. बॉडीक्लॉकने ठरवलेल्या वेळेनुसार रात्री नऊ वाजता जेवले पाहिजे. परंतु कामाच्या वेळा आणि व्याप यामुळे नऊ वाजता जेवण मिळतच नाही. अशावेळी कोणत्याही वेळी मिळालेले जेवण पचतही नाही आणि चांगलेही लागत नाही. तेव्हा ऑस्ट्रेलियन संशोधकांनी माणसाच्या आरोग्या मध्ये शक्यतो बिघाड होऊ नये म्हणून बॉडीक्लॉकवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. बॉडीक्लॉकनुसार कामे करण्याने आरोग्य चांगले राहते हे खरे आहे, परंतु तसे काम आपल्याला मिळेलच याची काही खात्री देता येत नाही. तेव्हा ऑस्ट्रेलियन डॉक्टरांनी विकसित केलेले हे औषध बॉडीक्लॉकला माणसाच्या दिनक्रमानुसार सेट करून देते आणि मग पुढच्या सार्‍या समस्या आपोआप सुटायला लागतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही