मोदींचे ३१ मार्चपासून नवरात्र उपास

भाजपचे पंत्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ते देवीचे निस्सिम भत्त* असल्याचे सांगितले असतानाच देवीच्या आराधनेसाठी ते नवरात्राचे नऊ दिवस उपवास करणार आहेत. सोमवारी चैत्रीपाडव्यापासून चैत्री नवरात्राची सुरवात होत आहे. दरवर्षीच या नऊ दिवसांत मोदी गुजराथबाहेर पडत नाहीत आणि कडक व्रत करतात. यंदा लोकसभा निवडणुकांमुळे त्यांना गुजराथबाहेर राहावे लागत आहे मात्र नऊ दिवसांचे उपवास ते करणार आहेत. या दिवसांत ते केवळ लिंबू पाण्यावर राहतात. यामुळे देशात त्यांचे राजकीय वजन वाढताना दिसत असले तरी शरीराचे वजन मात्र निश्चित कमी होताना दिसणार आहे.

बुधवारी माता वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन मोदींनी आपल्या प्रचाराच्या सभा सुरू केल्या आहेत. दिवसभराचे काम संपल्यानंतर ते देवीची आराधना करतात आणि यावेळात आपला माता दुर्गेशी संवाद होत असतो असेही सांगतात. आपल्या साक्षीभाव पुस्तकाचे प्रकाशन करताना त्यांनी ही माहिती दिली होती.

मोदींचे भाऊ सांगतात त्यांना पहिल्यापासून खाण्यापिण्याची खूप आवड नाही. नाश्त्याला फळे व रात्रीच्या जेवणात कढी खिचडी व कधीतरी खाकरा ते पसंत करतात. नवरात्रात नऊ दिवस कडक उपास केल्यानंतर ते शास्त्रोक्त पद्धतीने हळूहळू जेवण वाढवत नेतात असेही त्यांनी सांगितले.

वाराणसीत मोदी समर्थकांनी मोदी यांनाच देवीस्वरूप मानले असून या देवी सर्वभूतेषु, मातृरूपेण संस्थिता,नमस्तयै, नमस्तयै, नमस्तयै नमो नमः या दुर्गा सप्तशती मंत्राचे या मोदी सर्वभूतेषु, राष्ट्ररूपेण संस्थिता, नमस्तयै, नमस्तयै  नमो नमः असे स्वरूप केले आहे. हर हर मोदींवरून नुकतेच उठलेले वादळ अजून शमते आहे, तो पर्यंतच आता या नव्या मंत्रीची भर मोदी समर्थकांनी घालून आणखी वादाला जागा करून दिली असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment