भारताची विजयाची हॅटट्रिक

मिरपूर-  यजमान बांगलादेशवर आठ विकेटनी विजय मिळवत माजी विजेता भारताने टी-२० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरी जवळपास निश्चित केली. गटवार साखळीतील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. या विजयासह भारताने ब गटात सहा गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने शुक्रवारी बांगलादेशचे १३९ धावांचे आव्हान नऊ चेंडू राखून पार केले. 

बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या १३९ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. शिखर धवन केवळ एक धावा काढून बाद झाला. त्यानंतर रोहित आणि विराट यांनी दुस-या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. शर्मा ५६ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट आणि महेंद्रसिंग ढोणीने विजयाची औपचारीकता पूर्ण केली.  त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने प्रथम फलंदाजीकरत १३८ धावा केल्या होत्या. गेल्या दोन सामन्यात प्रभावी गोलंदाजी करणा-या अमित मिश्राने पुन्हा कमाल दाखवली. त्याने तीन गडी बाद केले. तर आर.अश्विन याने दोन आणि मोहम्मद शामीने एक गडी बाद केले. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे बांगलादेशला २० षटकात सात बाद १३८ धावा करता आल्या.

Leave a Comment