स्पायडर मॅन बनून मागतोय मते

निवडणूकीचा प्रचार करण्यासाठी कोण काय शक्कल शोधेल हे सांगणे अवघड आहे. भारताचा स्पायडरमॅन म्हणून प्रसिद्ध असलेला गौरव शर्माही याला अपवाद नाही. गौरव दक्षिण मुंबईतून अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवत आहे.

त्याने मते मागण्यासाठी कोणत्याही इमारती भिंतीवरून चढून जाण्याचे त्याचे कौशल्यच वापरले आहे. स्पायडरमॅनचा वेश करून तो रोज प्रचारासाठी निघतो आणि मतदारांच्या दरवाज्यावर ठोठावण्याऐवजी त्यांच्या खिडक्यांत लटकून मते मागतो. कोणत्याही बिल्डींगवर तो सहज चढून जातो आणि खिडक्या, भितींना लटकून मते देण्याचे आवाहन करतो. रोज सकाळपासून सायंकाळ पर्यंत तो अशा प्रकारे आपला प्रचार करत आहे.

गौरवच्या या लिलांमुळे बालचमू खूष असला तरी मतदानासाठी या बालचमूंचा कांही उपयोग नाही याचीही त्याला जाणीव आहे. त्यामुळे नागरिकांना मते मागताना तो या भागाचा विकास करणार असल्याचे आश्वासन देतोय. त्याच्या या अनोख्या प्रचाराकडे किती मतदार आकर्षित होतात ते निवडणूक निकालानंतरच कळू शकणार आहे.

Leave a Comment