रिक्षा सोडून राजकारणात आले नवनिर्माण करत करोडोपती झाले !!

पुणे (विशेष प्रतिनिधी) –   निवडणुकीत उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते हे मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी काहीतरी स्टंटबाजी करत असतात. असाच स्टंट मनसेचे दीपक पायगुडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना केला. रिक्षा सोडून पायगुडे राजकारणात आले अन त्यांचे मनसे नवनिर्माण होऊन ते करोडोपती झाल्याचे चोवीस तासातच मतदारांसमोर आले. त्यांच्याकडे तब्बल 11 कोटींची मालमत्ता असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. असे नवनिर्माणाचे भाग्य लाभलेले रिक्षावाले किती असतील अशी चर्चा पुण्यात सुरू झाली आहे !

पुण्यात सुमारे सत्तर हजार रिक्षा आहेत. पुणेरी रिक्षावाला हे फेमस व्यक्तीमत्व आहे. रिक्षा हे आम आदमीचे वाहन असल्याचे सांगत अरविंद केजरीवाल यांनी रिक्षेतून जाण्याची स्टंटबाजी दिल्लीप्रमाणेच मुंबईतही केली. असाच स्टंट मनसेचे दीपक पायगुडे यांनी केला. आपण आपल्या कमाईची सुरूवात रिक्षा चालवण्यापासून केली असल्याने आपण लोकसभेची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रिक्षेतून आलो असे पायगुडे यांनी सांगितले. याला चांगली प्रसिद्धीही मिळाली.

त्यानंतर चोवीस तासातच दीपक पायगुडे यांच्याकडे 11 कोटींची मालमत्ता असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून उघड झाले. त्यात सात कोटींची स्थावर मालमत्ता सोडली तरी चार कोटींची जंगम मालमत्ता आज पायगुडे यांच्याकडे आहे हे उघड झाले आहे. कारण स्थावर मालमत्तेची किंमत ही रेडी रेकनरच्या दरानुसार ठरत असते. यंदाच्या दरानुसार ती सात कोटी आहे पण पुढच्यावेळी याच मालमत्तेची किमत वाढलेली दिसेल.

पंधऱा ऑगस्ट चौकातील शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख म्हणून दीपक पायगुडे यांनी राजकीय कारकिर्द सुरू केली. त्यानंतर ते नगरसेवक झाले, त्याच टर्ममध्ये विरोधी पक्षनेतेही झाले. त्यानंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ते आमदार झाले. सेनाभाजपची सत्ता काळात ते आमदार होते त्यानंतर पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून ते आमदार झाले. म्हणजे नगरसेवक ते दोनदा आमदार अशी राजकीय कारकीर्द पायगुडे यांची आहे.

युतीशासनाच्या काळात लोकसेवा बँकेची स्थापना दीपक पायगुडे यांनी केली. पुढे ते राज ठाकरे यांच्या मनसेचे सरचिटणीस झाले. त्याचवेळी सैनिकी शाळा, लोकसेवा बझार, लोकसेवा किचन असे विविध लोकोपयोगी उपक्रम त्यांनी सुरू केली. त्यात मतदारसंघ फेररचनेत पायगुडे यांना विधानसभेचा मतदारसंघच राहिला नाही त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली नाही.

मागच्या लोकसभेच्यावेळी कलमाडींना सहाय्यभूत ठरतील आणि भाजपला अडचणीचे ठरतील असे रणजीत शिरोळे यांना त्यानीच मिळवून उमेदवारी लोकसभेची दिली. यावेळी मनसेची पुण्यातील तादक वाढल्यावर पुन्हा शिरोळे यांना उमेदवारी न देता ते स्वताच उभे राहिले, याचे समर्थन हे निर्णय राज ठाकरे यांचे होते असेच पायगुडे करणार. या दरम्यान पायगुडे यांच्याकडे किती मालमत्ता जमा झाली याचे रहस्य काल जाहीर झाले. रिक्षा चालवणारे पायगुडे हे रिक्षेचा व्यवसाय सोडून राजकारणात आल्यावर करोडोपती झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 

Leave a Comment