दक्षिण मध्य मुंबईत गायकवाड यांची परिक्षा

दक्षिण मध्य मुंबई या कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्यामतदारसंघात एकनाथ गायकवाड पुन्हा निवडून येण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.  दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणूकीत इथून काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड विजयाची हॅटट्रीक करतील याची खात्री देता येत नाही. प्रस्थापित सरकार विरोधात असणा-या लाटेचा त्यांना सामना करावा लागणार आहे तसेच २०१२ च्या महापालिका निवडणूकीत धारावीमध्ये काँग्रेसची निराशाजनक कामगिरी झाली होती.

धारावी हा एकनाथ गायकवाड यांचा बालेकिल्ला समजला जातो. ते धारावीमेळे! या मतदारसंघातून गायकवाड तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे लोकसभेवर पुन्हा निवडून जाण्यासाठी एकनाथ गायकवाड यांना धारावीच्या मतदारांची साथ आवश्यक आहे. दादर येथील मराठी मतदार , माहिम, सायन येथील कोस्मोपोलिटिन मतदार , धारावी, वडाळा येथील वंचित मागास वर्गातील मतदार, चेंबूर, अणूशक्तीनगर कोस्मोपोमिटिन भाग दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. कुठल्या एका भाषिकांचे या मतदारसंघामध्ये प्राबल्य नसून, हा संपूर्ण मतदारसंघ बहुभाषिक मतदारांमध्ये विभागला गेला आहे.

धारावी, चेंबूर, अणूशक्तीनगर असा झोपडपट्टीचा मोठा पट्टा या मतदारसंघात येतो. झोपडपट्टीतल्या मतदारांबरोबर शिवसेना आणि मनसेमध्ये होणारे मतविभाजन काँग्रेससाठी महत्वाचे ठरणार आहे. सन २००४ च्या लोकसभा निवडणूकीत एकनाथ गायकवाड यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ  नेते मनोहर जोशी यांचा पराभव केला. तेव्हापासून ते जायंट किलर म्हणून ओळखले जाऊ लागले. २००९ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या सुरेश गंभीर यांचा ७५ हजार मतांनी पराभव केला.

त्यावेळी मनसेच्या श्वेता परुळेकर यांनी एक लाखाहून अधिक मते घेऊन गायकवाड यांचा विजयाचा मार्ग सुकर केला होता. त्यामुळे यावेळीही शिवसेना-मनसेमध्ये होणारे मतविभाजन काँग्रेसच्या विजयात निर्णायक ठरु शकते. दक्षिण मुंबई हा आरपार पसरलेला मतदारसंघ आहे. येथे सर्वच समाजाचे मतदार आहेत. दादरमध्ये मराठी मतदारांचे प्राबल्य आहे तर, धारावीमध्ये देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. चेंबूर-अणूशक्तीनगरमध्ये दलित, मुस्लिमबहुल वस्ती आहे. यावेळी इथून शिवसेनेकडून राहुल शेवाळे, मनसेकडून आदित्य शिरोडकर आणि आपकडून सुंदर बालक्रृष्णन रिंगणात आहेत.

आम आदमी पक्षाला देशभरात मोठया प्रमाणावर प्रसिध्दी मिळत असली तरी, या मतदारसंघात काँग्रेस, मनसे आणि शिवसेना असा तिरंगी सामना होणार आहे. शिवसेनेने मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून इथून राहुल शेवाळे या तरुण नेत्याला उमेदवारी दिली आहे. राहुल शेवाळे मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. राजकरणात येण्यापूर्वी शेवाळे अभियंते होते. निर्णायक क्षणी मतांची जुळवाजुळव करण्यात बेरजेचे राजकरण करण्याचे कौशल्य शेवाळेंकडे आहे. मात्र स्थायी समिती अध्यक्ष म्हणून ते निष्प्रभ ठरले आहेत.

मनसेने येथून आदित्य शिरोडकर यांना उमेदवारी दिली आहे. आदित्य शिरोडकर मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहेत. ते राज ठाकरे यांचे व्यावसायिक भागीदार आणि मित्र राजन शिरोडकर यांचे पुत्र आहेत.

विविध कार्यक्रमांच्या आयोजनामुळे आदित्य शिरोडकर काही प्रमाणात मतदारांना परिचित आहेत. मात्र त्यांची मदारही राज यांच्या करिष्म्यावर अवलंबून आहेत. या लोकसभा मतदारसंघातील माहिम विधानसभा क्षेत्र मनसेकडे आहे. या मतदारसंघावर मनसेची मजबूत पकड आहे. इथले मनसेचे आमदार नितीन सरदेसाई यांच्या विकासकामांच्या जोरावर महापालिका निवडणुकीत माहिम विधानसभा क्षेत्रातून मनसेने नगरसेवक पदाच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. शिवसेना येथी पूर्णपणे पराभूत झाली. तो पराभव शिवसेनेच्या चांगलचा जिव्हारी लागला. पक्षाच्या भक्कम संघटनात्मक बांधणीचा इथे आदित्य शिरोडकर यांना फायदा होऊ शकतो. या भागातून मोठी आघाडी घेण्याचा मनसेचा प्रयत्न राहील. ज्यामुळे सर्वाधिक नुकसान शिवसेनेचे तर फायदा काँग्रेसचा होऊ शकतो. या लोकसभा क्षेत्रा अंतर्गत येणा-या विधानसभेच्या सहापैकी पाच जागा काँग्रेसकडे आहेत. गायकवाड दलित नेते आहेत त्यामुळे दलित आणि मुस्लिमांची मते आपल्याला मिळतील असा त्यांना विश्वास आहे. चेंबूर, अणूशक्तीनगर,वडाळा, धारावी या पट्टयातील झोपडपट्टीतल्या मतांवर गायकवाड यांची मदार आहे.

Leave a Comment