गोपाळांच्या खेळातून बाळ हद्दपार

आपल्या देशात राजकारण्यांनी, धंदेवाइकांनी आणि धंदेवाईक राजकारण्यांनी कोणत्याही खेळाचा कसा खेळखंडोबा केला आहे याचा अनुभव आपण क्रिकेटमध्ये घेतच आहोत. क्रिकेटचे हवाला आणि बेटिंग प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे आणि न्यायालयाने या खेळाचा बट्ट्याबोळ करणार्‍या लोकांची भर न्यायालयात लाज काढायला कमी केले नाही. कारण त्यांनी खेळाचे चोंभाळे करून टाकले आहे. क्रिकेटमध्ये करोडांंच्या उलाढाली असल्याने  आपल्याला त्यातले राजकारण प्रकटपणे दिसते तरी पण काही खेळांचे पार वाटोळे झाले आहे. पैसा आणि राजकारण यामुळे या खेळाचे मूळचे स्वरूप नाहीसे झाले आहे आणि त्यांना नवे हिडिस स्वरूप आले आहे. दहीहंडी या खेळावे असेच झाले आहे पण हा खेळ दरसाल एकदाच खेळला जातो म्हणून त्याचे राजकारण आपल्याला बारा महिने जाणवत नाही पण त्याचीही रया या लोकांनी घालवली आहे. 

हा खरे तर  बाळगोपाळांचा जन्माष्टमीला खेळायचा सोज्वळ खेळ. बाळ श्रीकृष्ण हा खेळ खेळत असे आणि गोकुळात त्याचे कौतुक होत असे. कृष्णाने आणि त्याच्या मित्रांनी लोणी चोरून खाऊ नये म्हणून ते उंचावर टांगून ठेवलेले असायचे पण श्रीकृष्ण ते उंचावरचे शिंके फोडून लोणी चोरत असे. त्यासाठी त्याचे सवंगडी एकमेकांच्या पाठीवर उभे रहात असत. तोच झाला दहीहंडीचा खेळ. तो लहान मुलांचा खेळ आहे. मोठ्या मुलांचा नाही. कारण मिसरुड फुटलेली मुले काही लोणी चोरून खात नाहीत. मुले जेवढी निरागस आणि लहान असतील तेवढी ती या खेळाला योग्य. पण आता जमाना उलटा आला आहे. आता सरकारचा एक फतवा निघणार आहे. ज्यात दहीहंडीच्या खेळात १४ वर्षांच्या आतील मुलांना घ्यायला बंदी घालण्यात येणार आहे. जे गोविंदा मंडळ अशा लहान मुलांना दहीहंडीच्या खेळात घेईल त्या मंडळाच्या संघटकांना कैदेची आणि दंडाची सजा  केली जाणार आहे. आपण एखाद्या खेळाचा किती विपर्यास करू शकतो याचे हे एक मासलेवाईक उदाहरण आहे. खरे तर दहीहंडी हा लहान मुलांचा खेळ असल्यामुळे तो त्यांनीच खेळावा, १४ वर्षांच्या वरील मुलांना तो खेळण्यास बंदी असेल असा कायदा व्हायला हवा होता पण झालेय ते विपरीतच आहे. असे का झाले? याला कारण आहे आपण केलेले दहीहंडीचे व्यावसायीकरण. 

या व्यावसायी करणाने हा  सोहळा केवळ धार्मिक राहिला नाही आणि तो मुलांचाही राहिला नाही. तो स्पर्धात्मक खेळ झाला आहे.  उंचाउंचावर दहीहंड्या लावल्या जात आहेत आणि त्या फोडण्यासाठी अधिकाधिक मजल्यांचे मानवी मनोरे उभारले जात आहेत.  त्यांना लाखा लाखाची बक्षिसे लावली जायला लागली आहेत. दहीहंडी जितकी उंच तितके मनोरे मोठे आणि जितका मनोरा मोठा तेवढा पुरस्कार मोठा असा नियमच होऊन गेला आहे. या प्रकाराला गोविंदाची मंडळे तर जबाबदार आहेतच पण बक्षीस लावणारे दानशूर लोकही जबाबदार आहेत.  कारण हेच लोक अधिकाधिक मोठी बक्षिसे लावून गोविंदांना मोठे मनोरे उभारण्यास भरीस घालत असतात. मनोर्‍यांची उंची जेवढी वाढेल तेवढा त्यात सहभागी होणार्‍या गोविंदांच्या जीवाचा धोका वाढेल याकडे कोणाचे लक्ष नाही. उलट मोठे मनोरे रचणार्‍या गोविंदांच्या मंडळांचे कौतुक केले जाते. त्या कौतुकाने गोविंदा सुद्धा चेकाळतात. मोठे मनोरे रचतात  आणि ते कोसळतात. 

असे मनोरे जेवढे मोठे होत जातात तेवढी त्या मनोर्‍याच्या खालच्या मजल्यावरील गोविंदांच्या शरीरावरचा भार वाढत जातो. खरोखरच ही एक कल्पना करण्यासारखी गोष्ट आहे. तळातले गोविंदा वरच्या मजल्यावरच्या सहा-सात थरांचा भार शरीरावर घेतात आणि तो घेऊन बराच वेळ थांबलेले असतात. म्हणून तिथे मोठी मुले लागतात. हा वरचा भार कमी व्हावा म्हणून वरच्यावरच्या मजल्यावर लहान मुलांचा वापर केला जातो. अशा रितीने हा खेळच बदलून गेला. या प्रकारात लहान मुलांच्याही जीवाला धोका होऊ शकतो. कारण तो वरून पडण्याची भीती असते. म्हणून बालकांच्या हक्कासाठी संघर्ष करणार्‍या काही संघटनांनी बालगोविंदांच्या वापराला बंदी घालण्याची मागणी केली होती. सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार केला. गेल्याच महिन्यामध्ये सरकारने याबाबत निर्णायक पावले उचलली. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांच्या उपस्थितीत संबंधितांच्या बैठकी घेतल्या. त्या बैठकीतून बालगोविंदांना बंदी घालण्याची कल्पना योग्य असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आणि सरकार या निष्कर्षाप्रत आले की, अशी बंदी घालण्यात काही चूक नाही आणि आता त्यादृष्टीने सरकारची निर्णायक पावले पडायला लागली आहेत. म्हणजे हा लहान मुलांचा खेळ आधी मोठ्या मुलांचा झाला आणि आता कायद्याने त्यातून लहान मुलांना बाद केले जाणार आहे.

Leave a Comment