सुनील गावस्कर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष

<p>नवी दिल्ली – इशारा देऊनही बीसीसीआय अध्यक्षपदाची खूर्ची न सोडणा-या एन.श्रीनिवासन यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने काही काळासाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन दूर केले असून, त्यांच्या जागी भारताचे माजी कर्णधार आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. 

सुनील गावस्कर यांना बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष बनवले असले तरी, त्यांच्या हाती फक्त आयपीएलच्या सातव्या मोसमाची सूत्रे दिली आहेत. आयपीएल व्यतिरिक्त बीसीसीआयच्या सर्व दैनंदिन कारभाराचे अधिकार बीसीसीआयचे उपाध्यक्ष शिवलाल यादव यांना देण्यात आले आहेत. आयपीएलचा सातवा मोसम पूर्ण होईपर्यंत गावस्कर बीसीसाआयचे अध्यक्ष रहातील. सध्याचे सर्व आठही संघ आयपीएलमध्ये खेळू शकतात असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालायने गुरुवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलचा सातवा मोसम खेळू नये असा प्रस्ताव दिला होता. 

मात्र सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दोन्ही संघांवर तसेच कुठल्याही खेळाडूवर कोणतीही बंदी घातली नाही. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने एन.श्रीनिवासन यांच्या आयसीसी अध्यक्षपदाच्या मार्गात कोणाताही अडथळा आणलेला नाही. जुलै महिन्यात श्रीनिवासन आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे संभाळू शकतात असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. गावस्कर यांचा आयपीएलबरोबर समालोचक म्हणून करार आहे. गावस्कर यांना या करारामधुन बाहेर पडण्याचे आदेश देताना, बीसीसीआयलाही या कराराची भरपाई देण्याचे आदेश दिले.</p>