‘ड’ जीवनसत्वाचा अभाव

माणसाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी जीवनसत्व ‘ड’ आणि कॅल्शियम या दोन्हींचे महत्व ङ्गार आहे. या दोन्हींच्या अभावामुळे माणसाच्या प्रकृतीत अनेक प्रकारचे दोष राहून जातात. विशेषत: वृद्धावस्थेमध्ये हाडे ठिसूळ होणे, अस्थिभंग होणे किंवा सातत्याने हाडे दुखणे हे विकार तर या दोन घटकांच्या अभावामुळे सरसकट दिसून येतात. भारतामध्ये विशेष करून महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये या दोन्हींचा अभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. आपण सर्वसाधारणपणे असे मानतो की, कोणतेही व्हिटॅमीन किंवा कॅल्शियमसारखे पोषक अन्नद्रव्य गरिबांना उपलब्ध होत नाहीत आणि पैसेवाल्या श्रीमंताना ते पैशामुळे उपलब्ध होते. एकंदरीत ‘ड’ जीवनसत्व आणि कॅल्शियमचा अभाव हा गरिबीचा परिणाम आहे, अशी आपली समजूत असते. मात्र अनेक डॉक्टरांनी प्रदीर्घ निरीक्षणाअंती असा निष्कर्ष काढला आहे की, ड जीवन-सत्वाचा अभाव हा श्रीमंतांचाच रोग आहे. 

डॉक्टरांच्या मते ड जीवन-सत्वाचे दोनच जीतेजागते स्रोत आहेत. एक आहे ऊन आणि दुसरे आहे ङ्गीश लिव्हर ऑईल. यातले ऊन आपल्या अंगावर पडल्यामुळे त्यातून ड जीवनसत्व भरपूर मिळते आणि ङ्गीश लिव्हर ऑईल खाण्यामुळे हे जीवनसत्व उपलब्ध होते. मात्र ङ्गीश लिव्हर ऑईल सर्वांना सर्वत्र उपलब्ध होईलच याची शाश्‍वतीही नाही आणि अनेकांना ते मानवतही नाही. म्हणजे आपल्या शरीरात ड जीवनसत्व तयार करण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश. नेमके माणूस श्रीमंत व्हायला लागला की, सूर्यप्रकाश टाळायला लागतो. गरीब लोकांना उन्हातान्हात काम करावे लागते. त्याशिवाय त्यांचे पोटच भरत नाही आणि ऊन तर तापदायक असते. तेव्हा माणूस शिकून शहाणा होतो तेव्हा तो सावलीमध्ये बसून, ङ्गॅनचा वारा घेत काम करण्याची नोकरी मिळते का, याचा शोध घ्यायला लागतो. 

किंबहुना उन्हापासून बचाव करणारी नोकरी आणि काम मिळणे हे आपल्यासाठी सुखाचे लक्षण असते. आता आता तर केवळ ङ्गॅनच्या वार्‍याने भागत नाही. ए.सी. असावा लागतो. वातानुकुलित यंत्रणा आता इतकी सामान्य झालेली आहे की, ती ङ्गार श्रीमंत लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही. मध्यमवर्गीय लोक सुद्धा आपल्या घरातली निदान निजण्याची खोली तरी ए.सी. असावी यासाठी सरसकट घरामध्ये ए.सी. बसवायला लागलेले आहेत. ऊन आणि उष्णता यापासून दूर पळण्यासाठी अनेक कार्यालये सुद्धा ए.सी. झालेली आहेत. लोक ए.सी. कारमधून प्रवास करायला लागले आहेत. या ए.सी.मुळे ड जीवन-सत्वाचा पुरवठा होत नाही आणि हे श्रीमंतीमुळे घडते. ड जीवनसत्वा विषयी बरीच चर्चा केल्यानंतर संशोधक आता अशा निष्कर्षाप्रत आले आहेत की, दररोज किमान अर्धा तास  अंगावर सूर्यप्रकाश पडणे हा ड जीवनसत्वाचा अभाव घालवण्याचा सर्वात प्रभावी इलाज आहे.