समुद्रावरचे जिप्सी

चीन भारताप्रमाणेच विविध परंपरांनी नटलेला देश आहे. चीनच्या दक्षिण पूर्व भागात सुमारे ७ हजार मच्छिमार कुटुंबे गेली १३०० वर्षे म्हणजे इसवी सन ७०० पासून समुद्रावरच वास्तव्य करून आहेत हे आपल्याला माहित आहे का?. मच्छीमार म्हणजे समुद्राजवळ कोळीवाड्यातून राहणार हे आपल्याला माहिती असते पण ही कुटुंबे नावांमधूनच राहात असून ही तरंगती वस्तीच तेथे पाहायला मिळते. गेली कित्येक शतके समुद्रातच राहात असल्याने त्यांना जिप्सीज ऑफ द सी या नावाने ओळखले जाते.

असे सांगितले जाते की फुजियान राज्यात ही टांका जमात राहात होती मात्र तांग राजवंशाकडून त्यांच्यावर फार अत्याचार केले जात होते. वारंवार युद्ध करायची पाळी त्यांच्यावर यायची. त्यामुळे कंटाळून ही जमात समुद्रात राहू लागली ती आजही तशीच राहते आहे. आजही ते जमिनीवर यायला तयार नाहीत तसेच आधुनिक जीवनशैली स्वीकारायलाही तयार नाहीत.

तांग राजवटीनंतर चीनमध्ये कम्युनिस्ट शासन आले तरीही हे लोक समुद्रातच राहणे पसंत करत असत. इतकेच काय त्यांची लग्ने कार्येही या तरंगत्या घरातूनच पार पाडली जात असत. मात्र गेली कांही वर्षे सरकारने दिलेल्या प्रोत्साहनामुळे टांका जमात समुद्र किनार्‍यालगत घरे बांधू लागली आहे. मासेमारी हाच मुख्य व्यवसाय ते करत आहेत. मात्र आजही या भागात समुद्रात पसरलेली त्यांची तरंगती वस्ती पर्यटकांसाठी आकर्षण ठरते आहे.

Leave a Comment