श्रीवर्धन हरिहरेश्वर

महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वर ही जुळी गांवे पर्यटकांत लोकप्रिय असून अगदी एक दोन दिवसांच्या सुट्टीतही ही सहल होऊ शकते अशी आहेत. त्यामुळेच वर्षभर या ठिकाणी राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यातूनही पर्यटकांचा ओघ सतत असतो.

श्रीवर्धन हे ऐतिहासिक ठिकाण आहे. यात्रेच्यावेळी पांडवांनी त्यातही अर्जुनाने या ठिकाणाला भेट दिली होती असे संदर्भ सापडतात. त्यानंतर १६ व्या १७ व्या शतकात हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होते. प्रथम अहमदनगरचा निजाम आणि नंतर विजापूरचे शाह यांनी या शहराचा महत्त्वाचे बंदर म्हणून असलेले महत्त्व ओळखून त्याचा तसा वापर केला होता. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे हे जन्मगांव. उत्तरोत्तर या गावाचा विकास होत गेला आणि अनेक बांधकामे, तटबंदी या गावाभोवती उभारली गेली असे सांगतात.

आज इतिहासात श्रीवर्धन हे पेशव्यांचे गांव म्हणून अधिक ओळखले जाते. पेशव्यांचे मूळ आडनांव भट. मात्र नंतर पेशवे किताबावरूनच त्यांना पेशवे हे नांव पडले. त्यांनी त्यांच्या राज्यकारभारासाठी पुणे राजधानी म्हणून निवडली असली तरी तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव यांनी आपल्या या मूळगांवी मोठे घर बांधले. त्याचे नुकतेच नूतनीकरण केले गेले आहे. बाजीरावांचा पुतळाही १९८९ साली येथे बसविला गेला आहे.

श्रीवर्धनचा सम्रुद्रकिनारा प्रेक्षणीय आहेच पण येथून जवळच असलेले कोंडवली, दिवेआगर येथील समुद्रकिनारेही अतिशय सुंदर आहेत. गावांत पेशव्यांचे मुख्य देऊळ असून हे लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन आहे तसेच अन्य कांही मंदिरेही पाहण्यासारखी आहेत. कोकणची खासियत असलेली नारळी पोफळीची बने, आंबा फणसांचा राया आहेतच. गांव छोटे असल्याने मोजकीच हॉटेल्स आहेत पण अनेक घरातून निवासाची तसेच भोजनाची सोय होऊ शकते.

श्रीवर्धनपासून १४-१५ किमीवर असलेले हरिहरेश्वर ही दक्षिणेची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. चारीबाजूंनी टेकड्यांनी वेढलेले हे सुंदर ठिकाण देवघर म्हणजे हाऊस ऑफ गॉड म्हणूनही ओळखले जाते. येथेच सावित्री नदी समुद्रला मिळते. हरिहरेश्वराचे भव्य मंदिर आणि दोन आकर्षक समुद्र किनारे ही येथली मुख्य आकर्षणे.हे मोठे यात्रा स्थळही आहे. मंदिर १६ व्या शतकातले असून आत ब्रह्मा, विष्णू महेश यांच्या मूर्ती आहेत तशीच पार्वतीचीही मूर्ती आहे. आवारात काळभैरवाचेही मंदिर आहे.

या मंदिरातून खाली उतरण्यासाठी असलेल्या पायर्यांैवरून गेले की थेट समुद्रात जाता येते. मंदिर असलेल्या टेकडीभोवती ओहोटीच्या वेळी गेले तर समुद्राच्या काठाने मोठी प्रदक्षिणा घालता येते. मात्र येथे लाटा अति जोरात येतात आणि अनेक वेळा समुद्र खवळल्यासारखा होतो. त्यामुळे स्थानिकांचा सल्ला घेऊनच ही प्रदक्षिणा करणे सोयीचे ठरते. हरिहरेश्वरचा समुद्र किनारा छोटा आहे पण फार सुंदर आहे. याच किनार्या वर महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने तंबू ठेाकून रिसॉर्ट केले आहे. आगावू बुकींग करून येथे राहण्याची व्यवस्था होऊ शकते.

Leave a Comment