नवी दिल्ली- भारतात मोबाइलची संख्या जवळपास ९० कोटींच्या घरात आहे. हा मोबाइल चालण्यासाठी हॅँडसेटबरोबरच त्यातील ऑपरेटिंग सिस्टीम महत्त्वाचे असते. गुगलने काढलेले ‘अँड्राइड’ ही ऑपरेटिंग सिस्टीम जगातील बहुतांश मोबाइलमध्ये वापरले जाते. हे सॉफ्टवेअर वापरण्यात अत्यंत सोपे व सुलभ आहे. याच अँड्राइड फोन्सना आता ‘डेंड्रॉइड’ व्हायरसचा धोका आहे. हा व्हायरस तुमचा पूर्ण फोन निकामी करतो. हा व्हायरस घुसल्यास संपूर्ण मोबाइलचा तो ताबा घेतो. तो मोबाइलमधील ‘अँड्राइड अॅप्लिकेशन पॅकेज’ नाहीसे करतो, असे कम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडियाने (सीइआरटी-इन) सांगितले आहे.
हॅकिंग, फिशिंग आणि इंटरनेट सुरक्षेबाबत ही संस्था भारतात काम करते. ‘डेंड्राइड’ या व्हायरसचे नाव ‘अँड्राइड’ या ऑपरेटिंग सिस्टीमच्या नावाशी साधर्म राखणारे आहे. त्यामुळे मोबाइलमध्ये कोणतेही अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. अन्यथा हॅकर्स तुमच्या मोबाइलमधील सर्व यंत्रणा दूरवरून निकामी करू शकतो. विशेष कॉल्सचा इतिहास, वेब पेजेस, रेकॉर्ड कॉल्स, एसएमएस, छायाचित्र, व्हीडिओ आदी तो रद्द करू शकतो, असा इशारा ‘सीईआरटी-इन’ने दिला आहे.
विशेष म्हणजे मोबाइलचा तुम्ही वापर किती केलेला आहेत, यावर सातत्याने लक्ष ठेवा. अन्यथा तुम्हाला भरमसाठ बिल येऊ शकेल. त्यामुळे ज्या ‘अॅप’विषयी तुम्हाला माहिती नाही ते डाऊनलोड करू नका. तसेच कोणतीही सिस्टीम डाऊनलोड करण्यापूर्वी ते स्कॅन करून घ्यावेत. तसेच मोबाइल सिक्युरिटी सोल्यूशन बसवून घ्यावेत. तसेच आपल्या मोबाइल डेटा आणि बॅटरी वापरावर लक्ष ठेवत राहा, असा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर असुरक्षित आणि अनभिज्ञ ‘वाय-फाय’ नेटवर्क वापरू नये. कारण सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येणा-या ‘वाय-फाय’ नेटवर्कमधून व्हायरस पसरण्याची शक्यता आहे. तसेच आपल्या अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टीमचा कायम बॅकअप ठेवत राहा, असेही संस्थेने सांगितले आहे.