पवार – केजरीवाल नेतृत्वावर ही विश्वासार्हतेची मोहोर !!

पुणे (विशेष प्रतिनिधी) –   ही लोकसभेची निवडणूक भाजप व काँग्रेस या दोन पक्षांच्या आघाडीत जरी होत असली तरी दोन वर्षाच्या आम आदमी पार्टीने देशभरात आतापर्यंत 350 उमेदवार उभे करून एक धक्का दिला आहे. पवारांनीही त्यांच्या पक्ष काढला तेव्हा त्यांना महाराष्ट्रात पुरेसे उमेदवारही मिळाले नव्हते. सत्ता मिळण्यासाठी पुरेसे चांगले उमेदवार मिळणे हा नेतृत्वाच्या विश्वासार्हतेचा विषय असून त्यासाटी काँग्रेस-भाजप अन पवारांच्या राष्ट्रवादीलाही झगडावे लागत आहे. पवारांना राष्ट्रवादीसाठी 22पैकी 21 उमेदवार मिळाले पण केजरीवालांना 350 मिळतात ही या दोन्ही नेतृत्वाची विश्वासार्हता आहे.

 दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर आम आदमी पार्टीची लोकांनीच दखल घ्यायला सुरूवात केली. त्यांच्याकडे उमेदवारांची रांग लागणेही स्वाभाविक होते. पण या पार्टीची उमेदवारी देतानाची तत्व ठरलेली आहेत. उमेदवाराविरूद्ध कोणताही खटला अथवा दावा असता कामा नये, तो गुन्हेगार किंवा भ्रष्टाचारी नसावा वगैरेवगैर. असे असूनही देशभरात 350 चांगले उमेदवार शोधण्यात केजरीवाल यांना यश मिळाले आहे. त्यांच्याकडे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणा-या अधिका-यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचीच गर्दी दिसत आहे. ही विश्वासार्हता केजरीवाल यांनी अवघ्या दोन वर्षात मिळवली आहे. 

महाराष्ट्रात पवारांना प्रेमाने देशाचे नेते असे संबोधले जाते पण केजरीवाल यांना असे काहीही न संबोधताही ते न कळत देशाचे नेते होताना दिसत आहेत. सन 1999पासून पक्ष काढल्यापासून ते आजपर्यंत पवारांना महाराष्ट्रात 48 उमेदवारही लोकसभेसाठी मिळालेले नाहीत. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पहिल्या निवडणुकीत पवारांनी अन्य राज्यात नगण्य संख्येने का होईना पण उमेदवार दिले होते पण तो इतिहास आहे. मेघालयमध्ये सत्ता राष्ट्रवादीची असल्याचे ढोल यांनी वाजवले पण ती सत्ता पी. ए. संगमा यांची होती हे स्पष्ट आहे. गोव्यात त्यांचे दोन आमदार होते पण आज महाराष्ट्र सोडला तर कुठेही आमदार वा खासदर राष्ट्रवादीचे नाहीत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या वाट्याच्या 22 जागांपैकी एका जागेवर त्यांना उमेदवार मिळाला नाही त्यामुळे त्यानी ती जागा काँग्रेसला दिली.

बरं, पवारांच्या राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी  निकष नाहीत. फक्त निवडून येण्याची क्षमता हा एकच निकष आहे. आम आदमी पार्टीने जे निकष उमेदवारी नाकारण्यासाठी लावले आहेत ते निकष राष्ट्रवादीत त्या उमेदवाराचे प्लस पाँइंट म्हणून तिकीट देताना धरले जातात. तरीही पवाराना एकदाही 48 उमेदवार लोकसभेसाठी देता आले नाहीत ही वस्तूस्थिती आहे.

आपल्या तत्वाशी तडजोड न करणारे म्हणून केजरीवाल यांची विश्वासार्हता वाढली. या उलट पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी मुद्यावर काँग्रेस सोडली. निवडणुकीनंतर त्याच विदेशी सोनिया गांधी त्यांना जवळच्या वाटल्या अन गेली 10 वर्षे ते त्यांच सोनियांच्या आश्रयाला आहेत. मागच्यावेळेपासून त्यांनी मुलीलाही तेथेच नेले आहे. जसे मोदी-राहुल गांधी हे सत्तेत येणार असे लोकांना वाटत असल्याने लोक त्यांच्या गाडीत बसण्यासाठी धडपडत आहेत. ही त्या दोन नेत्यांची विश्वासार्हता आहे. त्याचवेळी केजरीवाल यांच्या गाडीत राजकीय चेहरा नसलेले चांगल्या चारित्र्याचे लोक बसताना दिसतात ही केजरीवाल यांची विश्वासार्हता आहे. पण राष्ट्रवादीत यंदा तिकीटासाठी नकार घेण्याची आणि आयात केलेल्या उमेदवारांना तिकीट देऊन कोटा पूर्ण करण्याची वेळ पवारांवर आली ही पवारांची विश्वासार्हता आहे.

Leave a Comment