द्रमुकूला तिसर्‍या फुटीचे वेध

तमिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळहम हा भारतातला जुना पक्ष आहे पण या पक्षाचे नेते एम करुणानिधी यांनी या पक्षाला आपली वैयक्तिक मालमत्ता बनवले. एकदा ती कुटुंबाची मालमत्ता झाली की तिच्या वाटणीवरून घरात बेदिली होणार हे अपरिहार्य असते. शिवसेनेचे तसेच झालेले नाही का ? तेलुगु देसमचेही तसेच. किंबहुना देशातल्या अनेक राजकीय पक्षांना प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे स्वरूप आले आहे. जुन्या काळातल्या सरंजामशहांनी आपापल्या जहागिरी सांभाळल्या होत्या तसे एकेका नेत्याने आपले हे संस्थान सांभाळले आहे. राजकीय पक्षात जो नेतृत्व करू शकतो तोच नेता झाला पाहिजे पण या सार्‍या पक्षांत जो नेत्याच्या पोटी जन्माला येतो तोच नेता होतो. शेवटी पक्षाचा  शेवट होतो. द्रमुक पक्षाला तसेच नष्ट होण्याचे वेध लागले आहेत. पक्षाचे  सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे ज्येष्ठ चिरंजीव अळागिरी यांना त्यांचे कनिष्ठ बंधू एम. के. स्टॅलिन यांचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाल्यानंतर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारले असता आपल्या बडतर्फीमुळे आपले नुकसान होणार नसून पक्षाचेच नुकसान होणार आहे असा दावा केला. 

त्यांनी गेल्या काही दिवसात केलेल्या कारवाया पाहिले असता द्रमुक पक्षाचे चांगले दिवस संपत आले आहेत हे लक्षात येते. कारण त्यांनी अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. परंतु त्यातली त्यांनी घेतलेली वैको यांची भेट सर्वाधिक महत्वाची आहे. वैको हे तामिळनाडूतले प्रभावी नेते आहेत. झंझावाती पदयात्रा आणि घणाघाती भाषण यामुळे ते लोकप्रिय आहेत. ते पूर्वी द्रमुक पक्षातच होते आणि त्यांच्या व्यक्तीमत्वामुळे करुणानिधीनंतर पक्षाचे नेतृत्व त्यांच्याकडेच येणार असे मानले जात होते. १९८० च्या दशकातली ही गोष्ट आहे. व्ही. गोपालस्वामी अर्थात वैको हे कितीही लोकप्रिय असले तरी करुणानिधींना घराणेशाहीची बाधा व्हायला लागली होती आणि त्यांनी आपले कनिष्ठ चिरंजीव एम.के. स्टॅलिन यांना पक्षाचा भावी नेता म्हणून पुढे आणायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांनी वैको यांचे खच्चीकरण सुरू केले. परिणामी वैको यांनी द्रमुकमधून बाहेर पडून मारुमलारीची द्रविड मुन्नेत्र कळहम (एम.डी.एम.के.) हा पक्ष स्थापन केला. त्यांच्या मुळाशी करुणानिधी यांच्या स्टॅलिनप्रेमाची पार्श्‍वभूमी आहे. आता त्यांचे पक्षातून काढून टाकलेले ज्येष्ठ चिरंजीव अळागिरी यांच्याही मनामध्ये एम.के. स्टॅलिनविषयीचा द्वेषच आहे. म्हणूनच अळागिरी आणि वैको हे दोघे मिळून द्रमुकला बरेच खिळखिळे करू शकतात अशी शक्यता आहे. 

दोघांचेही द्रमुकमध्ये खच्चीकरण झालेले आहे आणि दोघांचाही शत्रू स्टॅलिन हाच आहे. या सगळ्या घटना शिवसेनेत घडलेल्या घटनांसारख्याच आहेत. वैको आणि अळागिरी यांची हातमिळवणी पक्की झाली आणि त्यांना जयललितांनी साद घातली तर द्रमुक हा पक्ष काही दिवसात संपू शकतो. येत्या दोन-चार दिवसांत अळागिरी यांच्या नव्या पक्षाची घोषणा होण्याची शक्यता आहे.  दक्षिण भारतात प्रादेशिक पक्षांची संख्या फार मोठी आहे. आंध्र प्रदेशामध्ये आता केवळ दोन वर्षात तीन नवे प्रादेशिक पक्ष जन्माला आले आहेत. जगन मोहन रेड्डी, चंद्रशेखर राव, चंद्राबाबू नायडू, पवनकुमार आणि किरणकुमार रेड्डी यांचे हे पक्ष आहेत. कर्नाटकात सुद्धा श्रीरामलू आणि येडीयूरप्पा यांनी आपापले पक्ष काढले होते. पूर्वी बंगारप्पा यांचा एक वेगळा पक्ष होता. केरळात तर सात-आठ प्रादेशिक पक्ष आहेत. तमिळनाडूत द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन मुख्य प्रादेशिक पक्षांशिवाय एम.डी.एम.के., डी.एम.डी.के., राजीव कॉंग्रेस, तमिळ कझगम असे अनेक लहान लहान पक्ष आहेत. आता त्यात अळागिरी यांच्या एका पक्षाची भर पडणार आहे. परंतु या विघटनाने द्रविड मुन्नेत्र कळहम (डी.एम.के.) हा सर्वात जुना प्रादेशिक पक्ष अस्ताला चालला आहे. या पक्षाचे अस्तित्व नष्ट होणे हे भारताच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीतले मोठेच पर्व ठरणार आहे. 

द्रमुक हा पक्ष १९४९ साली अण्णा दुराई यांनी स्थापन केला. या पक्षाच्या स्थापनेला स्वातंत्र्याच्या लढ्यातील ब्राह्मणेतर चळवळीची पार्श्‍वभूमी होती. समाजातले ब्राह्मणांचे वर्चस्व संपवून बहुजनांचे वर्चस्व निर्माण करण्याच्या भावनेतून जन्माला आलेल्या चळवळीचे रुपांतर द्रमुक या पक्षात झाले होते. हा पक्ष १९४९ साली स्थापन झाला, परंतु या पक्षाला १९६७ मध्ये तामिळनाडूतली सत्ता मिळाली. तिथली कॉंग्रेसची सत्ता संपुष्टात आली. अण्णा दुराई यांचे दोनच वर्षात निधन झाले आणि सारी सूत्रे करुणानिधी यांच्या हाती आली. १९७२ साली चित्रपट अभिनेते एम.जी. रामचंद्रन या पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी अखिल भारतीय अण्णा द्रमुक हा पक्ष स्थापन केला. १९९३ साली वैको यांच्या बाहेर पडण्याने आणखी एक फूट पडली आणि आता या पक्षात अळागिरी यांच्या रुपाने तिसरी फूट पडत आहे. या पूर्वीच्या दोन फुटी झाल्या तरी द्रमुकचे वर्चस्व म्हणावे तसे कमी झाले नव्हते, पण आता मात्र करुणानिधी खूप वृद्ध झाले आहेत आणि त्यांच्या घरातच फूट पडली आहे. त्यामुळे या पक्षाचे जहाज बुडण्याची शक्यता आहे. एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाची क्षमता करुणानिधी एवढी नाही. त्यामुळे करुणानिधींच्या पश्‍चात द्रमुक नावाचा हा देशातला जुना राजकीय पक्ष कालगत होण्याची शक्यता आहे. अण्णा दुराई यांच्यानंतर करुणानिधी यांच्याकडे या पक्षाची सूत्रे आली होती, परंतु करुणानिधी यांनी पक्षात नवे नेतृत्व निर्माण करण्याऐवजी  पक्षाला कुटुंबाच्या मालमत्तेचे स्वरूप दिले. त्यामुळे द्रमुक नावाची चळवळ इतिहासजमा होत आहे.

Leave a Comment