दक्षिण मुंबईत चुरशीची लढत

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात उत्कंठावर्धक लढत रंगेल असा निवडणूक विश्लेषकांचा अंदाज आहे. मराठी भाषिकांचा टक्का जास्त असूनही या मतदारसंघातून मराठी भाषिक उमेदवाराच्या विजयाची खात्री देता येत नाही. कारण येथे मराठी मतदार शिवसेना आणि मनसेमध्ये विभागला गेला आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत येथून काँग्रेसचे मिलिंद देवरा निवडून आले होते. शिवसेना आणि मनसेमध्ये झालेल्या मतविभाजनाचा थेट फायदा काँग्रेसच्या देवरा यांना झाला होता. 

मतदारसंघ फेररचनेमध्ये दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ दक्षिण मुंबईत विलीन झाल्यानंतर नव्याने आकारास आलेल्या या मतदारसंघात उच्चभ्रू आणि सर्वसामान्य मतदार एकत्र आले आहेत. भारतातील श्रीमंत, प्रभावशाली व्यक्तींबरोबर सर्वसामान्य गिरणी कामगारही या मतदारसंघात रहातो. यंदा इथून काँग्रेसकडून मिलिंद देवरा, शिवसेनेकडून अरविंद सावंत, मनसेकडून बाळा नांदगावकर आणि आपकडून मीरा सन्याल रिंगणात आहेत. मिलिंद देवरा विद्यमान खासदार तर, बाळा नांदगावकर शिवडी विधानसभेचे आमदार आहेत. मनसे रिंगणात उतरल्याने देवरा यांचे आव्हान काही प्रमाणात सोपे झाले असले तरी, प्रस्थापित सरकार विरोधात असलेल्या लाटेचा त्यांना सामना करावा लागणार आहे. मागच्यावेळी मराठीच्या भावनिक मुद्यामुळे मनसेला मोठया प्रमाणात मतदान झाले होते. त्याचा थेट फायदा काँग्रेसला झाला होता. यावेळी अशी कुठलीही लाट नाही. त्यामुळे मराठी मतदार मनसेच्या पाठिशी उभा रहाणार का ? हा प्रश्न आहे. 

शिवडी, वरळी या विधानसभा मतदारसंघात ४० टक्क्याहून अधिक मराठी मते आहेत. २००९ मध्ये विधानसभा निवडणूकीत शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर निवडून आले होते. मात्र तीन वर्षांनी झालेल्या महापालिका निवडणूकीत या विधानसभा क्षेत्रातील सर्वच्या सर्व महापालिकेच्या जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. त्यामुळे या पट्ट्यातील मतदान उमेदवाराच्या विजयात निर्णायक ठरु शकते. या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा जागांपैकी तीन जागा काँग्रेसकडे, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि भाजपकडे प्रत्येकी एक जागा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मिळून एकूण चार आमदार असले तरी, मराठी मतदारांचा टक्का अधिक असल्याने कुठल्याही एका उमेदवाराच्या विजयाची खात्री देता येत नाही. 

संपुआ सरकारवर अनेक आरोप झाले असले तरी, मिलिंद देवरा यांची स्वच्छ प्रतिमा ही जमेची बाजू आहे. मलबार हिल, कफ परेड, मरीन ड्राईव्ह, नरीमन पॉईंट बरोबरच परळ, लालबाग, शिवडी, वरळी या कामगार वस्तीतही देवरा यांनी आपल्या खासदार फंडातून मोठया प्रमाणावर लोकोपयोगी कामे केली आहेत.

Leave a Comment