काँग्रेसकडून श्रमिकांची ताकद गेली ! भाईंची मिळाली !!

पुण:  पुण्याच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला कोणाची ताकद मिळते यावर मतांचे गणित यावेळी उमेदवार जास्त असल्याने अवलंबून असणार आहे. आम आदमी पार्टीचे सुभाष वारे यांच्या मागे श्रमिकांची ताकद उभी राहिली तर काँग्रेसच्या कदमांच्या मागे सुरेशभाईंच्या पाठिंब्याची ताकद आज उभी राहिल्याने ताकदीचा समतोल राखला गेला.

युद्धात काही वेळ आपली ताकद कमी होऊ न देणे हे ताकद मिळवण्याइतकेच महत्वाचे असते असे म्हणतात. त्याचा प्रत्यय आज काँग्रेसने घेतला. गेल्या निवडणुकीपर्यंत श्रमिकांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी जातीयवादी शक्तींच्या विरोधात श्रमिकांची ताकद काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे उभी केली होती. पण यावेळी राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष सुभाष वारे हे आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या मागे आज डॉ. बाबा आढाव यांनी त्यांची श्रमिकांची ताकद उभी केली आहे. वारे यांच्या निवडणूक अर्ज दाखल कऱण्याच्यावेळी डॉबाबा आढाव हे सुभाष वारे यांच्या बरोबर होते.

आता बाबाच जर वारे यांच्या बरोबर असतील तर मग त्यांच्या सगळ्या संघटनांचे कार्यकर्ते काय बोध घेणार यातून?   मागच्या निवडणुकीत श्रमिक, पथारीवाल्यांचा पाठिंबा काँग्रेसला होता. यावेळी तो असेलच असे दिसत नाही. त्यात काल बाबांनी पुणेकर आम आदमी पार्टीच्या बाजूने उभे रहातील असे सांगितले आहे. त्यामुळे यावेळी काँग्रेसच्या मतांच्या गणितातून श्रमिकांची मत कमी होणार हे नक्की झाले आहे. ही मत महायुतीकडे नाही गेली तरी वारे यांच्याकडे जातील पण त्यातून काँग्रेसचाच तोटा होणार आहे.एकीकडे काँग्रेस श्रमिकांची मत गमावत असताना दुसरीकडे विद्यमान खासदार कलमाडी यांनी मौन सोडून काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कलमाडी समर्थकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून ते कदम यांचे काम करायला मोकळे झाले आहेत. डॉ. विश्वजीत कदम यांच्यामागे कलमाडींची ताकद उभी राहिल्याने मतदारांचा पॉवर गेम हा बरोबरीत सुटण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment