असा आहे राहुल गांधींचा भ्रष्टाचार विरोध?

काँग्रेस भ्रष्टाचार के सक्त खिलाफ है असे एकदा राहुल गांधी अन सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना शिकवले. त्याची री आता सगळे नेते ओढत आहेत. काँग्रेसच्या करनी और कथनी मे फरक है असे सांगतात तेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत भ्रष्टाचार विरोधी जनलोकपाल विधेयकाचा मुद्दा काँग्रेसचे नेते आग्रहाने मांडत आहेत. तर दुसरीकडे निवडून येण्याची क्षमता या निकषाखाली भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना उमेदवारी देत आहेत.

पवनकुमार बन्सलपासून ते अशोक चव्हाण यांच्यापर्यंत ही यादी जाते. बन्सल यांच्या पुतण्यानेच टेंडर देण्यासाठी पैसे मागितल्याचे उघड झाले अन काकांना राजीनामा द्यायला लागला होता. पण त्याच बन्सल यांना चंदीगडमधून काँग्रेसने उमेदवारी दिली. हा न्याय महाराष्ट्रात प्रत्येक उमेदवारगणिक बदलला. पुण्यातून विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांना उमेवारी नाकारली ती राष्ट्रकूल खेळाच्या वेळी केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत म्हणून. त्यासाठी त्यांच्यामागे सीबीआयचा ससेमिरा लावला. त्यांना सीबीआय कोठडीत पाठवले. हा न्याय अशोक चव्हाण यांच्या बाबतीत उलटा लावला. अशोक चव्हाण हे नांदेड मधून इच्छुक होते.पण आदर्श सोसायटीच्या घोटाळ्यात ते एक आरोपी आहेत. एफआयआरमध्ये त्यांचेही नाव आहे. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेतले आणि त्यांना राजकीय अज्ञातवासात पाठवण्यात आले. आता निवडणुकांच्या रणधुमाळीत पुन्हा एकदा त्यांना अज्ञातवासातून बाहेर काढले अन तिकीट दिले. त्यांना तिकीट देण्यासाठी एकच निकष निवडून येण्याची क्षमता.

ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी पेडन्यूजच्या तक्रारीत हेच अशोक चव्हाण अकडले आहेत अन त्याच्या विरोधातील खटला प्रलंबित आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील सहकार लॉबी विरूद्ध काँग्रेस हायकमांडने कायमच विदर्भ अन मराठावाड्यातील नेत्यांचा वापर केलेला आहे. हीच परंपरा राहुल गांधी पुढे नेताना दिसत आहेत. या अशोक चव्हाण यांनी आदर्श प्रकरणात काय केले तर सासू व मेव्हणीला तेथे फ्लॅट मिळवून दिला. आता तो त्यांनी मिळवून देण्याची गरजच नव्हती कारण मुख्यमंत्र्यांचे जवळचे नातलग म्हटल्यावर कोणीही दिलाच असता, त्यात अदर्शचे प्रवर्तक गिडवाणी हे व्यापारी अन राजकारणी दोन्ही होते म्हटल्यावर तो त्यांच्या घरी जाऊन दिला असणार. आदर्शच्या एफआरआयमध्ये अशोक चव्हाण यांचे नाव आहे. त्यांच्यावर चौकशी अहवालातही ठपका ठेवण्यात आलेला आहे. मात्र काँग्रेसने ठपका असूनही अशोक चव्हाण यांच्यावर काहीच कारवाई केली नाही. चौकशी आयोगाचा अहवाल फेटाळण्याची नौटंकी पृथ्वीराज चव्हाण यांनी करण्याचा प्रयत्न केला पण राहुल बाबांनी डोळे वटारताच या अहवालातील अशोक चव्हाण यांना त्रासदायक होईल असा भाग वगळून तो अहवाल राज्य सरकारने स्वीकारला. चव्हाणांना त्रासदायक ठरणारा भाग कसा वगळला तर हायकमांडच्या मार्गदर्शनानुसार वगळण्यात आला. त्यानंतर सीबीआयने अशोक चव्हाण यांच्या विरोधात आऱोपपत्र दाखल करण्याला परवानगी मागितली ती राज्यपालांच्या मार्फत काँग्रेस हायकमांडने फेटाळली. त्यानंतर याच सीबीआयने चव्हाण यांच्या विरोधात सबळ पुरावे नसल्याचे न्यायालयात सांगून कोलांटी उडी मारली.

प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे हायकमांड म्हणजे मायलेक अशोक चव्हाण यांना वाचवताना दिसतात. त्याउपर त्यांना लोकसभेचे तिकीटही देतात. मग असाच न्याय कलमाडींच्या बाबतीत का केला नाही ? कलमाडी अन चव्हाण यांच्यात फरक एकच केला की कलमाडींना पक्षातून निलंबित केले अन चव्हाणांना पक्षातच ठेवले. चव्हाणांवर कारवाई झाली नाही ती त्यांच्या बापाच्या पुण्याईने, पण कलमाडीकडे अशी पुण्याईच नव्हती. त्यामुळे त्यांना पक्षातून बाहेर हकलण्यात आले. हा सर्व घटनाक्रम काय सांगतो तर राहुल गांधी यांची भ्रष्टाचाराच्या विरोधात कशी रणनिती आहे हे सांगतो. याचाच दुसरा अर्थ राहुल गांधी यांनी काँग्रेस भ्रष्टाचार के सख्त खिलाफ है हे सांगणे केवळ लोकांना मूर्ख बनवण्याचा एक भाग होता हे चव्हाण यांच्या उमेदवारीने सिद्ध झाले आहे.

ज्या काँग्रेसमध्ये प्रत्येक पावलागणिक भ्रष्ट नेत्यांची नावे येतात तो पक्षच हे भ्रष्टाचारी लोकच चालवत आहेत. मग असा पक्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात भूमिका कशी घेईल ? अशी जर खरच त्यांनी भूमिका घेतली तर आज दिसत असलेल्या काँग्रेसपैकी अर्धी काँग्रेस जेलमध्ये दिसेल. कलमाडींनी भ्रष्टाचार केला की नाही हे पुढे सिद्ध होईलच. जर अशोक चव्हाण यांना अनेकवेळा वाचवूनही वर तिकीटाची बक्षिसी दिली जाते तशी बक्षिसी कलमाडींना का नाही ? राष्ट्रकूल स्पर्धेत कलमाडींकडे खेळासाठी किती बजेट होते अन त्यात भ्रष्टाचार किती करण्यीच संधी असणार याचाही विचार सज्ञ पुणेकरांनी करण्याची वेळ आली आहे. त्याच स्पर्धेच्या निमित्ताने दिल्लीत हजारो कोटी रूपयांची कामे झाली मग मोठा भ्रष्टाचार करण्याची संधी कशात जास्त असणार शेदोनशे कोटींच्या बजेट मध्ये की हजारो कोटींच्या बजेटमध्ये ? मग त्यातील भ्रष्टाचारी गेले कुठे ?   दिल्लीत झालेल्या कामात एक पैशाचाही भ्रष्टाचार झालेला नाही हे सांगण्याची हिम्मत राहुल गांधी दाखवणार का !!

 

Leave a Comment