अखेर कलमाडींचा कदम यांना पाठिंबा!

पुणे –  राष्ट्रकुल घोटाळ्यात दोषी ठरल्यानं काँग्रेसनं उमेदवारी नाकारलेले पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार नसल्याचं आज स्पष्ट झालं आहे. येत्या निवडणुकीत आपण काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजीत कदम यांना पाठिंबा देऊ, असं जाहीर करून खुद्द कलमाडी यांनीच सर्व उलटसुलट चर्चांवर पडदा पाडला. पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी सुरेश कलमाडी आग्रही होते. 

आपल्याला तिकीट देणं शक्य नसेल, तर आपल्या पत्नीला संधी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. परंतु, काँग्रेसनं विश्वजीत कदम यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. त्यामुळे कलमाडींच्या गोटात नाराजीचा सूर ऐकू येत होता. ते बंडाच्या पवित्र्यात असून अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील, अशी कुजबूजही सुरू होती. परंतु आता पुण्याचा अट्टाहास कलमाडींनी सोडला. काँग्रेस नेत्यांनी समजूत काढल्यानंतर, सुरेश कलमाडी विश्वजीत कदम यांना मदत करण्यास तयार झाले आहेत. विश्वजीत यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्या विजयासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी आज दिली. त्यामुळे काँग्रेसनं सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Leave a Comment