अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ वापरणार नकाराधिकार

पुणे – देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने निवडणुकांच्या घोषणेपूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन राज्यात किमान पाच ब्राम्हण उमेदवार द्यावेत अशी मागणी केली होती तसेच पुणे लोकसभा मतदार संघात ब्राह्मण मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याने किमान एका पक्षाने ब्राह्मण उमेदवार देणे अपेक्षित होते मात्र तसे घडले नाही यामुळे मतदानाच्या वेळी नकाराधिकार वापरणार असल्याचे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

ब्राह्मण समाज हा एकनिष्ठतेचे प्रतिक असून मागील काळात ज्या भारतीय जनता पक्षासोबत समाज राहिला आहे त्या पक्षानेच समाजाला गृहीत धरून निवडणुकीची आखणी केल्याचे दिसते. राज्यसभेवर प्रकाश जावडेकर यांना, पुण्यातुन गिरिश बापट यांना तर महाराष्ट्रा बाहेर लालजी टंडन, हरिन पाठक, मुरली मनोहर जोशी, लालमुनी चौबे या सारख्या दिग्गजांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. अशी परिस्थिती पाहुन ब्राह्मण महासंघाच्या वतीने जाहिर करण्यात येते की, ब्राह्मण समाज हा कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नसून आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. तसेच निवडणुक आयोगाने आम्हाला नकाराधिकार दिला आहे असे सांगत पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील 47 मतदारसंघात समाजाने कोणताही जातीय अभिनेवेश न बाळगता निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी चांगल्या उमेदवाराला मतदान करावे मात्र पुणे लोकसभा मतदार संघात नकाराधिकार वापरावा असे आवाहन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस विश्‍वजीत देशपांडे, प्रदेशाध्यक्ष श्‍याम जोशी यांनी केले आहे.

Leave a Comment