रावेरचे भाजप खासदार हरिभाऊ जावळे नाराज

मुंबई- आगामी काळात होत असलेल्या निवडणूकीच्‍या पार्श्व्भूमीवर सर्वच पक्षात उमेदवारवरून नाराजी वाढत चालली आहे. सोमवारी भाजपचे रावेरचे विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांची जाहीर झालेली उमेदवारी भाजपने कोणतेही कारण न देता अचानक रद्द केली. त्यामुळे खासदार जावळे हे नाराज झाले आहेत. अचानक उमेदवारी रद्द करण्याची ही पद्धत योग्य नाही, असे त्यांनी सांगितले. पक्षाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने रावेरमधून जावळे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानुसार जावळे यांनी प्रचारही सुरू केला होता. मात्र गेल्या तीन दिवसांत अचानक सूत्रे फिरली आणि जावळे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यांच्या जागी विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
याबाबत बोलताना जावळे म्ह णाले, पक्षाने ज्या तडकाफडकीने उमेदवारी रद्द केली केली, ती पद्धत योग्य नाही. प्रदेश भाजपचे एक पत्र आपल्याला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

परिस्थितीनुसार उमेदवारीत बदल करावा लागत असल्याचे या पत्रात लिहिले आहे. मात्र त्यात उमेदवारी बदलाचे कोणतेही कारण दिले नाही. गेल्या तीन दिवसांत अशी कोणती परिस्थिती ओढवली, असा प्रश्न जावळे यांनी उपस्थित केला आहे. आपणासह कार्यकर्ते नाराज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पाष्ट केले.