कौलाल्मपूर – गेल्या दोन आठवडयापासून शोध सुरु असलेल्या मलेशियन एअरलाईन्सच्या बेपत्ता प्रवासी विमानाचे गुढ अखेर उकलले आहे. दक्षिण हिंद महासागरात एमएच-३७० विमानाला जलसमाधी मिळाल्याची माहिती मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी दिली. या विमानातील २३९ प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला. यात पाच भारतीय प्रवाशांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सच्या उपग्रहांनी दक्षिण हिंद महासागरात अवशेषांची काही छायाचित्र टिपली होती. त्यानंतर या भागात विमानाचा शोध सुरु झाला होता. उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्राच्या विश्लेषणावरुन या विमानाला जलसमाधी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. आठ मार्चचा कौलाल्मपूरहून बिजींगच्या दिशेने निघालेले हे विमान वाटेतून अचानक बेपत्ता झाले होते.
व्यापक प्रमाणात शोध मोहिम राबवूनही या विमानाविषयी काहीही माहिती मिळत नव्हती. जगातील अनेक देश या शोध मोहिमेत सहभागी झाले होते. विमानाच्या शोधासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यात येत होता. विमान सापडत नसल्याने विविध शक्यता व्यक्त करण्यात येत होत्या.