आढळरावांची मालमत्ता २५ कोटी

पुणे: शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे एकूण 25 कोटी 35 लाख 98 हजार 315 रुपयांची मालमत्ता असल्याचे उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. यामध्ये शेतजमीन, सोने, हिरे, घर आणि फ्लॅट यांचा समावेश आहे. 

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे आणि पत्नीच्या नावाने असलेल्या मालमत्तेचा तपशील जाहीर केला आहे. यामध्ये शिवाजीराव आढळराव यांच्याकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता अशी 16 कोटी 28 लाख 41 हजार 574 रुपयांची तर पत्नी कल्पना आढळराव पाटील यांच्याकडे 9 कोटी 7 लाख 56 हजार 741 रुपयांची मालमत्ता आहे. तसेच शिवाजीराव आढळराव यांच्यावर 3 कोटी 9 लाख 37 हजार 495 रुपयांचे तर पत्नीच्या नावे 3 कोटी 8 लाख 73 हजार 371 रुपयांचे कर्ज आहे. तसेच शिवाजीराव आढळराव यांच्याकडे 26 हजार रुपये किंमतीचे फक्त बोलेरो ही गाडी आहे. 

आढळराव यांच्या बॅंक खात्यामध्ये 1 लाख 4 हजार 459 रुपयांची तर पत्नीच्या बॅंक खात्यामध्ये 10 हजार 306 रुपयांची रोख रक्कम आहे. आढळराव यांच्याकडे 2 लाख 74 हजार 867 रुपयांची मुदत ठेव तर पत्नीच्या नावे 2 लाख 61 हजार 246 रुपयांची मुदत ठेव आहे. याचबरोबर बॉन्डस, शेअर्स, मुदत ठेव, इन्शुरन्स पॉलिसी आणि इतर मालमत्ता अशी 2 कोटी 94 हजार 89 हजार 201 रुपयांची मालमत्ता आढळराव यांच्याकडे आहे. आढळराव यांच्या नावे कोणतेही सोने नसून पत्नीनावे 40 लाख रुपये किंमतीचे सोने आहे. 

स्थावर मालमत्तेमध्ये लांडेवाडी आणि चिंचोडी येथील जमिन, मुंबई येथील फ्लॅट अशी एकूण 13 कोटी 33 लाख 52 हजार 373 रुपयांची तर पत्नीच्या नावे 7 कोटी 52 लाख 12 हजार 229 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात आढळराव पाटील यांनी 22 लाख 33 हजार 613 रुपये, तर त्यांच्या पत्नीने 22 लाख 92 हजार 685 रुपये इन्कम टॅंक्‍स भरला आहे.आढळराव पाटील यांच्यावर राजकीय स्वरूपाचे नऊ गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमुद केले आहे. 

Leave a Comment