विरेंद्र सेहवागची शाळा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावल्यानंतर भारताचा आघाडीचा फलंदाज आता शिक्षण क्षेत्रात करियरसाठी सिद्ध झाला आहे. गुरगांव पासून १५ किमी अंतरावर हरियानातील ग्रामीण भागात सेहवागने इंटरनॅशनल स्कूल सुरू केले आहे. गेले दोन महिने या संबंधीच्या जाहिराती पेपर, बॅनर, बेवसाईटवर झळकत होत्या तेव्हा विरेंद्र या शाळेची जाहिरात करतोय असाच सर्वांचा समज झाला होता. मात्र विरेंद्रने ही त्याचीच शाळा असल्याचे जाहीर केले असून या शाळेच्या प्रमोशनसाठी तो दुबई, कुवेत देशांना भेटी देत आहे. या शाळेच्या प्रमोशनसाठी अन्य काही पथके नेपाळ, भूतानलाही धडकली आहेत असे समजते.

सेहवाग म्हणाला की मी शाळेसाठी रोज पाच सहा तासांचा प्रवास करून जात असे. तेव्हापासूनच माझ्या वडीलांनी मला विद्यार्थ्यांना शाळा, खेळ यासाठी वेगळा प्रवास करावा लागणार नाही अशी शाळा मोठा झालास की सुरू कर असे सांगितले होते व वडिलांचे हे स्वप्न मी प्रत्यक्षात आणले आहे. या शाळेत अभ्यासाबरोबरच सर्व खेळांची सोय आहे. अगदी घोडेस्वारीची सुद्धा. ज्या परदेशी मुलांना भारतात शिक्षण घ्यायचे असेल त्यांच्यासाठी तर ही शाळा दुसरे घरच असेल असाही त्याचा दावा आहे.

२३ एकरांवर पसरलेल्या या शाळेसाठी हरियाना मुख्यमंत्री हुडा यांनी अनुदानात प्लॉट दिला असून येथे सध्या देश विदेशातील ४०० विद्यार्थी शिकत आहेत. येथे बोर्डिगचीही व्यवस्था आहे आणि बालवाडी ते दहावी असे वर्ग सध्या भरतात. निवासी विद्यार्थ्यांना त्यासाठी तीन लाख रूपये तर अनिवासी मुलांसाठी १ लाख रूपये शैक्षणिक शुल्क आकारले जाते आहे.

Leave a Comment