विकासाबाबत मुख्यमंत्र्यांचे मोदी यांना खुले आव्हान

कोल्हापूर: महाराष्ट्र आणि गुजरातच्या विकासाबाबत तुलनात्मक चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि  गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका व्यासपीठावर चर्चेस समोर यावे; असे खुले आव्हान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. आगामी लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागतील आणि कॉंग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे आतापेक्षा अधिक संख्येने खासदार निवडून येतील; असा दावाही त्यांनी केला. 

कोल्हापूर येथे गांधी मैदानात होणा-या कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेला उपस्थित रहाण्यासाठी मुख्यमंत्री येथे आले आहेत. महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये उद्योगासह अनेकविध क्षेत्रात झालेल्या विकासाची तुलना करण्यासाठी मोदी यांनी एका व्यासपीठावर चर्चा करावी. त्यामुळे विकासाचे दावे आणि वस्तुस्थिती यातील तफावत जनतेसमोर येईल आणि खरा विकास  झाला आहे; हे जनताच ठरवेल; असे चव्हाण यावेळी म्हणाले.
 सन १९९९ नंतर प्रथमच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते एकमेकांशी समन्वयाने वागून परस्परांच्या उमेदवारांचा हिरीरीने प्रचार करीत आहेत. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या जातीयवादी युतीचा कोणताही प्रभाव राज्यात जाणवणार नाही; असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात मोदींची लाट अस्तित्वात नसल्याचा दावाही त्यांनी केला.
 राज्यात सुरू असलेल्या शेतक-यांच्या आत्महत्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की गारपीट आणि अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनाने ४ हजार कोटीचे पेकेज जाहीर केले आहे. ऊसासह सर्व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. सरकार आपद्ग्रस्त शेतक-यांना अर्थसहाय्य देण्याबरोबरच इतर सर्व प्रकारची मदत करण्यास कटिबद्ध आहे; असे  सांगतानाच   शेतक-यांनी मृत्यूला कवटाळण्याचे शेवटचे टोक गाठू नये; असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.