लातूर मतदारसंघात कॉंग्रेसला बेदिली भोवणार

मराठवाड्यातला लातूर मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री (आताचे पंजाबचे राज्यपाल) शिवराज पाटील-चाकूरकर यांचा मतदारसंघ असल्यामुळे या मतदारसंघात आता काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. लातूर मतदारसंघ हा परंपरेने कॉंग्रेसच्या वर्चस्वाखालचा मतदारसंघ आहे. १९७७ साली शेकापचे ज्येष्ठ नेते उद्धवराव पाटील यांनी या मतदारसंघात आणीबाणीनंतरच्या वातावरणात विजय मिळवला होता. तेवढा अपवाद वगळता २००४ पर्यंत या मतदारसंघात कॉंग्रेसचाच उमेदवार सतत निवडून आला आहे. शिवराज पाटील १९८०, ८५, ८९, ९१, ९६, ९८ आणि ९९ अशा सात निवडणुका सतत जिंकले होते. २००४ साली मात्र कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या स्नुषा रूपा पाटील यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवून शिवराज पाटलांचा पराभव केला. 

२००९ साली हा मतदारसंघ राखीव झाला आणि विलासराव देशमुख यांनी आपले मित्र जयवंत आवळे यांना कोल्हापुरातून लातुरात आयात करून लोकसभेवर निवडून आणले. जयवंत आवळे त्या निवडणुकीत केवळ सात हजार मतांनी विजयी झाले. भाजपाच्या सुनील गायकवाड यांनी त्यांच्याशी चांगलाच सामना केला. आता पुन्हा सुनील गायकवाड भाजपाच्या तिकिटावर उभे आहेत. कॉंग्रेसचा उमदेवार मात्र बदललेला आहे. राहुल गांधी यांच्या नव्या फंड्यानुसार कार्यकर्त्यांनी उमेदवार ठरवला असल्यामुळे जयवंत आवळे हा बाहेरचा उमेदवार नको असा निर्णय झाला आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनसोडे गुरुजी हे उमेदवार म्हणून निवडून आले. 

भाजपाचे सुनील गायकवाड आणि कॉंग्रेसचे बनसोडे गुरुजी यांच्यात लातूरमधली लढत प्रामुख्याने होणार आहे. आम आदमी पार्टीने रत्नदीप निलंगेकर यांना उभे केले असले तरी त्यांचा फारसा प्रभावही नाही आणि आम आदमी पार्टीविषयी अजून तरी लातूरमध्ये आकर्षण नाही. त्यामुळे रत्नदीप निलंगेकर पाच आकडी संख्या तरी गाठतील की नाही, याविषयी शंका वाटते. मात्र दीपक अरविंद कांबळे हा बसपाचा उमेदवार चांगला प्रभाव टाकील आणि कॉंग्रेसला महाग पडेल.

दीपक कांबळे हे उदगीरचे राहणारे आहेत आणि त्यांचे वडील अरविंद कांबळे हे काही काळ आमदार होते. त्यांचे आजोबा तुळशीराम कांबळे हे मात्र १९६२ पासून १९७१ पर्यंत या मतदारसंघाचे खासदार होते. वंशपरंपरेने उमेदवारी मिळालेले दीपक कांबळे हे कॉंग्रेसमध्ये मात्र राहिलेले नाहीत, ते बहुजन समाज पार्टीत जाऊन उभे राहिले आहेत. ते जेवढे मते मिळवतील तेवढी बनसोडे गुरुजींची निवडणूक अवघड होईल. कॉंग्रेसच्या उमदेवाराची निवडणूक आणखी अवघड करणारा एक घटक म्हणजे कॉंग्रेसमधील सुंदोपसुंदी. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर कॉंग्रेस पक्षाची सूत्रे त्यांचे चिरंजीव अमित देशमुख यांच्याकडे आली आहेत. ते आपल्या वडिलांसारखा रुबाब करायला जातात, परंतु अनेक ज्येष्ठ नेत्यांना त्यांची पक्षातली दादागिरी पसंत नाही. श्री. शिवराज पाटील-चाकूरकर यांचा गट नेहमीच त्यांच्या विरोधात असतो. विलासराव हयात असताना या गटाला फारसा प्रभाव दाखवता आला नाही, परंतु त्यांच्यानंतर आता शिवराज पाटील-चाकूरकर यांचा गट मजबूत झाला आहे आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी सज्ज आहे. अशा प्रकारे कॉंग्रेसच्या उमेदवाराचे स्थान डळमळीत झाले असल्यामुळे लातूर मतदारसंघात मोदी लाटेच्या जोरावर भाजपाचे पारडे जड झाले आहे.

Leave a Comment