मोदी संघालाही जुमानणार नाहीत- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूका प्रामुख्याने दोन पक्षांत लढविल्या जात आहेत तसेच त्यांना राहुल विरूद्ध मोदी असे स्वरूपही आले आहे. मात्र मोदी ज्या तानाशाही पद्धतीने कारभार करत आहेत ते पाहता मोदी संघालाही जुमानणार नाहीत असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मत आहे. ते म्हणाले की भाजपतील वरीष्ठ नेत्यांना अतिशय वाईट वागणूक दिली जात आहे. मोदी एकतर्फी कारभार करत आहेत मात्र राहुल गांधी सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करत आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीपुढे निवडणुकांचे आव्हान आहे आणि त्यामुळे दोन्ही पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते यांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे अन्यथा त्याची किंमत दोन्ही पक्षांना चुकवावी लागेल असे सांगून ते म्हणाले की भाजप सेनेपेक्षा आमची परिस्थिती नक्कीच चांगली आहे. मुंडे- गडकरी आणि राज उद्वव यांच्यातील मतभेद आम्हाला फायद्याचे ठरणार आहेत. मुंबईत तर मनसेच्या उमेदवारांमुळे कॉग्रेसचा फायदा निश्चित आहे.

गारपीट ग्रस्त शेतकर्‍यांना उशीरा मदत दिल्याच्या आरोप खोटा आहे. उलट देशात सर्वात चांगले पकेज महाराष्ट्रातील या शेतकर्‍यांना देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. १ मे ६० रोजी महाराष्ट्र आणि गुजराथ ही वेगळी राज्ये झाली तेव्हापासून आजतागायत आम्ही सर्व क्षेत्रात गुजराथच्या पुढेच आहोत असेही ते म्हणाले.