पुणे – येत्या पंधरा दिवसांत दूरस्थ शिक्षण पद्धत सुरू करण्याचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (युजीसी) पाठविण्यात येणार आहे. युजीसीच्या मान्यतेनंतर विद्यापीठात दूरस्थ शिक्षण पद्धत सुरू होणार असल्याचे संकेत पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी दिले आहेत. त्यामुळे पुढील वर्षापासून बहि:स्थ शिक्षण पद्धत बंद होण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून पुणे विद्यापीठात बहि:स्थ शिक्षण पद्धत बंद करून, त्यास पर्याय म्हणून दूरस्थ शिक्षण पद्धत सुरू करण्याची मागणी काही व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांकडून होत आहे. याउलट सामाजिक बांधिलकी म्हणून बहि:स्थ शिक्षण सुरू राहावी, असा विचार करणारा एक गट आहे. त्यामुळे दरवर्षी बहि:स्थ शिक्षणावरून पुणे विद्यापीठ नेहमी चर्चेत राहते.
यासंदर्भात बीसीयुडीचे संचालक व्ही. बी. गायकवाड म्हणाले, दूरस्थ शिक्षणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. येत्या दोन आठवड्यात हा प्रस्ताव युजीसीकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर युजीसीची एक कमिटी विद्यापीठात येईल. दूरस्थच्या माध्यमातून कोणते अभ्यासक्रम सुरू करणार आहेत, त्याची माहिती घेण्यात येईल. या अभ्यासक्रमाचा आढावा घेतल्यानंतर युजीसीची मान्यता मिळेल. ही सर्व प्रक्रिया येत्या शैक्षणिक वर्षापूर्वी पूर्ण होणार असल्याची शक्यता आहे. मान्यता मिळताच दूरस्थ शिक्षण पद्धत सुरू होईल.
दरम्यान, दूरस्थ शिक्षण ही काळाची गरज आहे. मात्र, बहि:स्थ शिक्षणही गरजू विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे दूरस्थ शिक्षण सुरू होताच बहि:स्थ शिक्षण पद्धत बंद होणार असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर बहि:स्थ की दूरस्थ शिक्षण पद्धतीवर लक्ष केंद्रित करायचे, असा प्रश्न विद्यापीठासमोर निर्माण होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.