चव्हाणांच्या तिकिटावर कलमाडीचा निर्णय

पुणे/ विशेष प्रतिनिधी – पुण्याचे विद्यमान खासदार  कलमाडी यांनी दिल्लीहून पुण्यात येताच आक्रमक पवित्रा घेऊन आपणही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो; असे संकेत पुणेकर मतदार आणि कॉंग्रेस पक्षाला दिले. आपल्याला समाजवादी पक्षाची ऑफर असल्याचेही हस्ते- परहस्ते जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास केवळ ४८ तासांचा कालावधी बाकी असतानाही कलमाडी यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. याचे कारण म्हणजे कलमाडी यांची भूमिका पक्ष   मुख्यमंत्री अशोक चव्हाण अथवा त्यांच्या पत्नीला नांदेडमधून उमेदवारी देणार की नाही; यावर ठरणार आहे. कलमाडी आणि चव्हाण हे दोघेही एकाच ( भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या समुद्रात  भरकटणा-या) नावेचे प्रवासी आहेत. समदु:खी आहेत. त्यामुळे दोघांना पक्षाकडून समान न्याय मिळावा; अशी कलमाडी यांची अपेक्षा असणार. मात्र त्यात भेदभाव झाल्यास कलमाडी यांनी बंडा चा झेंडा उभारला तरी त्याला ‘नैतिक’ अधिष्ठान लाभणार आहे. 

मुंबईतील आदर्श इमारत घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची करावी लागली. त्यांच्या मागे वेगवेगळ्या चौकशांची लटांबरे लागली. चौकशी अहवालाने त्यांच्यावर ठपकाही ठेवला. असाच प्रकार कलमाडी यांच्या बाबतीतही घडला. कलमाडी यांच्यावर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यासाठी कलमाडी यांना तुरुंगाची हवाही खावी लागली. पक्षातून त्यांना निलंबित करण्यात आले. या निवडणुकीत केवळ त्यांनाच नव्हे;  त्यांच्या पत्नी मीरा कलमाडी आणि कॉंग्रेसचे शहराध्यक्ष असलेले त्यांचे खंदे समर्थक अभय छाजेड यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली.
 नांदेडच्या उमेदवारीबाबत मात्र अशोक चव्हाण यांचे नाव अजून चर्चेत आहे. त्यांना नाही तर त्यांच्या पत्नीला लोकसभेचे तिकिट मिळण्याच्या शक्यता अजून धुगधुगी धरून आहेत. त्याप्रमाणे पक्षाने चव्हाण अथवा त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली; तर कलमाडी हे चव्हाणांना एक न्याय आणि मला मात्र दुसरा का; असा  करून बंड उभारू शकतात. त्या बंडाला तार्किक समर्थनही मिळू  कलमाडी कदाचित याच संधीची वाट पहात असावेत.

Leave a Comment