इंडियन मुजाहेदीनला धक्का

भारतात इंडियन मुजाहेदीनचा आणखी एक अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. तो करताना अनेक स्फोटांच्या मागे हात असलेल्या खतरनाक अतिरेक्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल ५० किलो स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. या स्फोटकांचा वापर झाला असता तर मोठाच हाहा:कार झाला असता इतके हे स्फोटकांचे प्रमाण मोठे आहे. ही कारवाई राजस्थानात झाली. या दहशतवादी संघटनेच्या कामाची एक रीत आहे.  आजवर महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार ही त्यांच्या कामाची केन्द्रे होती. त्यामुळे गुप्तचर संघटनांनी सुरक्षिततेचा उपाय  म्हणून या राज्यांवर लक्ष केन्द्रित केले पण त्यांचे लक्ष विचलित करून या अतिरेक्यांनी अनपेक्षितपणे राजस्थानात डोके वर काढले. भारतात या लोकांना चांगला पाठींबा मिळतो कारण त्यांना बंदिकृत सीमी या संघटनेचे कार्यकर्ते मदत करीत असतात. सीमी ही संघटना बंदीकृत आहे पण तिचे कार्यकर्ते मोकळे आहेत. या संघटनेवर बंदी घालताना कार्यकर्त्यांवर बंदी घातलेली नाही. म्हणून सीमीचे काही कार्यकर्तेच इंडियन मुजाहेदीनचे अतिरेकी म्हणून काम करीत असतात. एखाद्या संघटनेवर बंदी घालणे ही गोष्ट किती अव्यवहार्य आणि निरर्थक असते याचे हे एक चांगले  उदाहरण आहे.

या संघटनांनी निवडणुकीत काहीतरी घातपाती कारवाया करण्याचा कट रचला होता. एखादा बॉंबस्फोट केला, एखाद्या नेत्याचे अपहरण केले किंवा एखाद्या नेत्याची हत्या केली की, या घटनेकडे जगाचे लक्ष वेधले जाईल आणि आपल्याकडेही लक्ष वेधले जाईल अशी त्यांची धारण आहे. या संघटनेच्या काही नेत्यांचे संवाद टेप केले गेले आहेत. गतवर्षी छत्तीसगडमध्ये नक्षलवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात २९ जण ठार झाले होते. इंडियन मुजाहेदीनचे हे नेते आपापसात बोलताना त्या घटनेचा उल्लेख करीत होते आणि असा काही प्रकार घडवायचा नसेल तर मग एवढी तयारी करून उपयोग काय अशी खंंत व्यक्त करीत होते.  याचा अर्थ त्यांचा अशी एखादी मोठी दहशतवादी कारवाई करण्याचा बेत होता.  तसे काही तरी करण्यातच काही तरी शौर्य आणि सार्थक आहे अशी त्यांची भावना होती.  अशा प्रयत्नासाठी काही लोकांना उद्युक्त करण्यासाठी  पाकिस्तानी नागरिक झिया उर्रहमान उर्फ वकास हा राजस्थानात आला होता. त्याच्यासह चौघांना अजमेर येथे अटक करण्यात आली.वकास याला अटक केली ते फार झकास झाले कारण सध्या भारतातल्या अनेक घातपाती कारवायांत सहभागी असलेल्या इंडियन मुजाहेदीन या संघटनेचा तो दुसर्‍या क्रमांकाचा म्होरक्या   होता. 

त्याच्या अटक करण्याने इंडियन मुजाहेदीन या संघटनेचे कंबरडे मोडले गेले आहे.  शिवाय येत्या निवडणुकीत मोठा घातपात करण्याचा त्यांचा बेतही फसला आहे. या संघटनेचा संस्थापक यासीन भटकल हा सध्या भारतातल्या काही तुरुंगांची हवा खात बसला आहेच. तो आता बाहेर पडण्याची सुतराम शक्यता नाही. त्याच्या अटकेने या संघटनेचे सारे अतिरेकी आणि पाकिस्तानातली आयएसआय संघटना फार हवालदिल झाली आहे. त्यांनी भटकळची सुटका करण्यासाठी काही तरी करण्याचा विचार सुरू केला होता. भारतातल्या एखाद्या मोठ्या नेत्याचे अपहरण करावी आणि त्याच्या सुटकेच्या बदल्यात भटकळची सुटका करून घ्यावी अशी धाडशी योजना त्यांच्या डोक्यात आहे.  त्यांना त्यात अजून तरी यश आले नाही. त्यामुळे ते हताश झाले आहेत.  त्यांनी भारतातल्या वकास याच्या काही हस्तकांना काही तरी करण्याचा आग्रह चालवला होता. तशी त्यांची तयारीही झाली होती असे दिसते कारण वकास याला अटक करून जप्त करण्यात आलेला दारुगोळा ५० किलोचा असून त्याच्या सोबत ४०० डिटोनेटर्स आहेत. एवढा दारुगोळा भारतात फार मोठा हाहा:कार माजवायला पुरेसा होता. वकासचा सहकारी मोनू हा या कामात गढला होता. पण  त्याला काही करण्याची संधी मिळत नव्हती. म्हणून इंडियन मुजाहेदीन या संघटनेने राजस्थानात एक नवीन मोड्यूल  सक्रिय केले होते. 

मोड्यूलची रचना आणि कार्यपद्धती फार वेगळी असते. ते नेमलेलेच असते पण त्याने वरच्या आज्ञा आल्याशिवाय काही करायचे नसते. राजस्थानात चोरून   काम करणारे सिमीचे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांना सूचना मिळाल्या की ते कामाला लागतात. तसा मोदू हा कामाला लागला होता. त्याने किती काम केले होते हे जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांवरून लक्षात येते. वकास हा या कामाची पाहणी करायला भारतात आला होता. त्याचा बनावट पासपोर्ट तयार करण्यात आला होता तो केरळातला नागरिक म्हणून करण्यात आला होता. त्यावर तो भारतात आला होता. त्याला आणि अन्य तिघांना अटक करण्यात आली पण तो ज्याला भेटायला आला होता तो मोदू काही सापडला नाही. तो बहुतेक पळाला असावा असे दिसते. वकासला अटक करण्याने मोठा धोका टळल्याचे पोलीस सांगत असले तरीही राजस्थान मोड्यूलचा कर्ताधर्ता असलेला मोदू जोपर्यंत सापडत नाही तो पर्यंत धोका टळलाय असे वाटत नाही. अशा दहशतवाद्यांची नजर नरेन्द्र मोदींवर असते. त्यांचा प्रयत्नही मोदींना दगाफटका करण्याचा होता असे दिसत आहे.

Leave a Comment