घरफोडीची त्वरीत सूचना देणारा रोबो नंदी

ठाणे – प्रवासाला जायचे म्हटले की घरफोडी होईल का ही भीती सतावू लागते. घरात सीसीटिव्ही बसविले असले तरी घरफोडी थांबविता येत नाही. त्यामुळे प्रवास निश्चिंत होईलच असे सांगता येत नाही. मात्र आता घराबाहेर कुठेही जाताना घरफोडी होईल काय याची भीती बाळगावी लागणार नाही. ठाण्यातील चिल्ड्रन टेक सेंटरमध्ये विविध शाळांतून आलेल्या ६ विद्यार्थ्यांनी असे गॅजेट तयार केले आहे की घरफोडी होत असतानाच त्याची सूचना तुमच्या मोबाईलवर त्वरीत मिळू शकेल आणि तुम्ही आपले शेजारी, मित्र यांना संदेश पाठवून घरफोडी थांबवू शकाल. रोबो नंदी असे या गॅजेटचे नामकरण करण्यात आले आहे

या सेंटरचे डायरेक्टर पुरूषोत्तम पंचपांडे याविषयी बोलताना म्हणाले की हे नऊ इंच उंचीचे मेटल डिव्हाईस आहे. यात तुम्ही तुमचा मोबाईल नंबर फीड करायचा आहे. तुमच्या घरात घुसायचा कोणी प्रयत्न करत असेल किवा चोरीचा प्रयत्न केला जात असेल तर हे उपकरण तुमच्या मोबाईलवर त्वरीत अॅलर्ट देईल. त्यामुळे तुम्ही घराबाहेर असलात तरी आपले शेजारी, मित्र यांना घरफोडीची सूचना देऊ शकाल व घरफोडी थांबवू शकाल. भगवान शंकराच्या दरवाज्यावर जसा चोहोकडे लक्ष ठेवणारा नंदी असतो, त्यानुसारच हे उपकरण तुमच्या घराकडे लक्ष ठेवेल व म्हणून त्याचे नामकरण रोबो नंदी असे केले गेले आहे. बाजारात हे उपकरण लवकरच दाखल होणार आहे.

शार्दूल दातार, हर्षद वेलींग, सनेल पाटील, व्योम व्यास, आमोद पंत आणि शौनक स्वरगांवकर या सहा विद्यार्थ्यांनी हे उपकरण तयार केले आहे.

Leave a Comment