सामाजिक जीवनात व्यक्तीचा नव्हे तर समूहाचा विचार व्हावा – भाई वैद्य

पुणे – केवळ व्यक्तीेचा विचार न होता समूहाचा विचार होणे गरजेचे आहे. सत्ता बदल असो की, चळवळीचे कार्य असो, एका व्यक्तीेपेक्षा समूहाचाच तिथे प्रभाव पडत असतो. धर्म, जात, लिंग, भाषा यापैकी कोणताच विचार न करता मनुष्याकडे केवळ निखळ माणूस म्हणून पाहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक भाई वैद्य यांनी व्यक्तय केले. 

मुस्लीम सत्यशोधक मंडळाचा समाज प्रबोधन पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि अक्षरमानव चळवळीचे संस्थापक राजन खान यांना देण्यात आला. त्या प्रसंगी वैद्य बोलत होते. हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी दिलावर सईद, हुसेन जमादार, तमन्ना शेख-इनामदार आदी उपस्थित होते. 

यावेळी वैद्य म्हणाले की, सध्या भांडवलशाहीची गरज आहे. चळवळीपुढे स्पष्ट उद्दिष्ठ नसेल तर योग्य दिशेने चळवळ पुढे जात नाही. यासाठी व्यक्तीेवादापेक्षा समाज बांधणी महत्त्वाची ठरते. परंतु सध्या दिवसेंदिवस जमातवादाचे आव्हान आपल्या पुढे वाढत आहे. माणसाने माणसाकडे माणूस म्हणूनच पाहण्यास सुरुवात केल्यास लवकरच जग सुखी होईल. 

यावेळी पुरस्काराला उत्तर देताना राजन खान म्हणाले की, पृथ्वीवरील सर्व माणसे शहाणी होण्यासाठी किमान लाख वर्षे जावी लागतील. कारण चार्वाकापासून गौतम बुद्ध, महात्मा फुलेंपर्यंतचे विचार आजही समाजात रूजले नाहीत. केवळ त्यांच्या विचारांची आठवण काढली जाते. ते आचरणात आणले जात नाहीत. आपण खूप औपचारिक आणि ढोंगी जगात राहतो. माणसांनी एकमेकांशी पारदर्शकपणे वर्तन केले पाहिजे. जातीय अस्मितेपेक्षा मानवी अस्मिता महत्त्वाची मानली पाहिजे. असे चित्र सर्वत्र निर्माण झाल्यास केवळ 100 वर्षात जातीयवाद नाहीसा होऊ शकतो. यावेळी त्यांनी साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार आपल्या आडनावामुळे आपल्याला मिळाले नसल्याचेही सांगितले. तर आजपर्यंत केवळ साहित्यासाठी पुरस्कार मिळाले; परंतु आजचा पुरस्कार कार्याला आणि व्यक्तीशला मिळाला असल्याने विशेष आनंद होत असल्याचे खान म्हणाले. यावेळी बाबा आढाव यांनी महात्मा फुलेंची प्रार्थना म्हटली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शमसुद्दीन तांबोळी यांनी केले.