शिवसेनेचे भाजपाला धडे

शिवसेनेच्या हातात सामना आहे आणि सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे. सामनात जे छापून येते ते शिवसेनेचे मत असते. पण सामनात जे छापून येते ते उद्धव ठाकरेच लिहितात असे नाही. आता सामनात जे कोणी लिहीत असतील त्यांनी खाजवून अवधान काढल्याप्रमाणे आपल्या  अग्रलेखातून भाजपाला शहाणपणा शिकवण्याचे सत्र सुरू केले आहे. आता अडवाणींची कड घेऊन भाजपाला ज्येष्ठ नेत्यांना कसे वागवावे याचे धडे द्यायला सुरूवात केली आहे. आता काही नेते ज्येष्ठ असतात याचा अर्थ त्यांना पक्षाने सतत उमेदवारी दिलीच पाहिजे असे काही आहे का ?राजकारणामध्ये वय महत्वाचे आहे की उपयुक्तता? याचे उत्तर कोणीही उपयोगिता असेच देईल. राजकारण हा एक व्यवहार आहे आणि त्यामध्ये उपयुक्ततेला महत्व आहे. एकदा एखाद्या नेत्याची उपयुक्तता संपली की, त्याला पक्षात पूर्वीसारखा मान मिळत नाही. याला कोणताही पक्ष अपवाद नाही. ज्याला  हे कळते आणि जो वेळीच बाजूला सरकतो. परंतु ज्याला हे कळत नाही, ऐंशी वर्षांपेक्षा अधिक वय झाले असूनही आणि उपयुक्तता संपली असूनही पुन्हा आपल्याला पूर्वीसारखाच मान मिळाला पाहिजे असा आग्रह धरतो त्याला मात्र मानहानीला तोंड द्यावे लागते. भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांची गेल्या पाच वर्षांपासून याच मुद्यावरून ससेहोलपट चाललेली आहे. परंतु ते निवृत्तीची भाषाच काढत नाहीत. त्यामुळे सातत्याने मानहानीला तोंड द्यावे लागत आहे. 

 ते काहीही असले तरी त्यांची मानहानी हा त्यांच्यापुरता वैयक्तिक प्रश्‍न असला पाहिजे. पण तो विषय आता भाजपा आणि शिवसेना यांच्यातल्या संघर्षाचा मुद्दा होतो की काय, अशी भीती वाटत आहे. कारण या आणि अशाच काही मुद्यांवरून शिवसेनेने भाजपाला टोकायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे वेगवेगळ्या निमित्तांनी आता भारतीय जनता पार्टीच्या मागे लागले आहेत. भारतीय जनता पार्टीशी आपली युती झालेली असल्याने त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार उभे करणे योग्य नाही हे त्यांना मान्य आहे. परंतु ही युती महाराष्ट्रापुरतीच आहे, त्यामुळे आपण अन्य राज्यांमध्ये भाजपाच्या विरोधात उमेदवार उभे करू शकतो अशी घोषणा त्यांनी केली आहे. खरे म्हणजे शिवसेनेला आहे त्या महाराष्ट्रातली संघटना टिकवणे अशक्य होऊन बसली आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. किमान सहा खासदारांनी तरी शिवसेना सोडलेली आहे. महाराष्ट्रात जिथे आपली वस्त्रे सावरता येत नाहीत तिथे आता शिवसेनेच्या नेत्यांनी अन्य राज्यांमध्ये शड्डू ठोकायला सुरुवात केली आहे. 

भारतीय जनता पार्टीने लालकृष्ण अडवाणी, जसवंतसिंग, मुरली मनोहर जोशी अशा पंच्याहत्तरी ओलांडलेल्या आणि तसेही राजकारणातले औचित्य गमावलेल्या नेत्यांना निवृत्त करण्याची भूमिका घेतली आहे. अर्थात त्यामुळे त्यांना लोकसभेची उमेदवारी नाकारलेली नाही, परंतु त्यांच्याच व्यक्तिमत्वामुळे लोकसभेचे जे मतदारसंघ भाजपासाठी सुरक्षित झाले आहेत त्या मतदार संघात नव्या लोकांना उभे करून या ज्येष्ठ नेत्यांना अन्य मतदारसंघ दिले आहेत. लालकृष्ण अडवाणी यांना गांधीनगरची उमेदवारी दिली आहे, परंतु अडवाणींना भोपाळ हवे होते. भोपाळ तर सुषमा स्वराज यांनाही हवे आहे आणि आज भारतीय जनता पार्टीला सुषमा स्वराज यांची जास्त गरज आहे. परिणामी अडवाणींना समजावून सांगून गांधीनगरमध्येच उभे राहण्यास भाग पाडले गेले आहे. परंतु या गोष्टीची खंत भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला वाटत नाही, ती उद्धव ठाकरे यांनाच जास्त वाटत आहे. त्यामुळे सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी भाजपावर ज्येष्ठ नेत्यांना अवमानकारक वागणूक देत असल्याचा ठपका ठेवला आहे. कोणत्या पक्षाने आपल्या कोणत्या नेत्याला कशी वागणूक द्यायची आहे हा त्या पक्षाचा प्रश्‍न आहे. त्यात दुसरे कोणी हस्तक्षेप करण्याची गरज नाही. 

 विशेषत: आपल्या मित्रपक्षामध्येच अशा घटना घडत असतील तर त्यावर आपण मौन पाळले पाहिजे, परंतु उद्धव ठाकरे यांना अडवाणींची का दया आली माहीत नाही. त्यांना अडवाणींची दया आली असेल तर तसाही त्यांना अधिकार आहे. कोणी कोणाची दया करावी यावर कोणी बंधन घालू शकत नाही. परंतु तसा नैतिक अधिकार आपल्याला असला पाहिजे. अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्याला मिळणारी वागणूक उद्धव ठाकरे यांना आवडत नसेल तर त्यांनी सुद्धा आपल्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना चांगली वागणूक दिली पाहिजे. तशी त्यांनी ती दिलेली नाही. मनोहर जोशी यांना काय वागणूक दिली हे सगळ्या जगाला माहीत आहे. जोशी यांना तिकीट नाकारले यात काही चूक नाही, पण भाजपाने अडवाणींना तिकीट नाकारलेले नाही आणि व्यासपीठावर त्यांचा अपमान केलेला नाही. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठांशी कसे वागावे याचे धडे भाजपाला देता कामा नयेत. शिवसेनेचे राज्यसभेचे उमेदवार भरतकुमार राऊत यांचेही उदाहरण आपण घेऊ शकतो. त्यांनी आपली महाराष्ट्र टाईम्स्मधली संपादकीय सेवा शिवसेनेसाठी सोडून दिली. शिवसेनेची दिल्लीत, मुंबईत आणि विविध माध्यमांत सक्षमपणे बाजू मांडली, परंतु त्यांना काय वागणूक मिळाली? मराठी माणसांच्या हितासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने वेणुगोपाल धूत यांना राज्यसभेचे तिकीट देऊन मराठीभाषिक राऊत यांना ठेंगा दाखवला. आपण जेव्हा लोकांकडे एक बोट दाखवतो तेव्हा तीन बोटे आपल्या बाजूने वळलेली असतात हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घेतले पाहिजे.

Leave a Comment