वेश्याव्यवसायास नकार देणार्‍या युवतीवर अत्याचार

भिवंडी: वेश्याव्यवसाय करण्यास नकार दिल्यामुळे 23 वर्षीय युवतीचा अमानुष शारीरिक छळ करणार्‍या तिघांविरोधात भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वेश्याव्यवसाय चालविणार्‍या महिलेला अटक करण्यात आली आहे. रुबिना (34, रा. हनुमान टेकडी, भिवंडी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून आलम आणि आफराज हे तिचे साथीदार अद्याप फरार आहेत.

आलम आणि आफराज यांनी पीडित युवतीला नोकरी देण्याच्या आमिषाने गुजरात येथून भिवंडीत आणले आणि त्यांनी तिला वेश्याव्यवसायासाठी रुबिनाच्या ताब्यात दिले. मात्र या युवतीने वेश्याव्यवसाय करण्यास नकार दिल्याने आरोपींनी तिच्या शरीराच्या विविध भागांवर चटके दिले. लोखंडी सळईने निर्घृण मारहाण केली. तसेच तिच्या छातीचा अग्रभाग कापून टाकला. या शारीरिक छळामुळे पीडित युवतीच्या तब्येतीची स्थिती अत्यंत नाजूक असून तिला प्रथम भिवंडी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी तातडीचे उपचार करुन ठाणे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

या अमानुष घटनेमुळे पीडित युवतीला जबरदस्त मानसिक धक्का बसलेला असून तिचा जबाब अद्याप घेण्यात आलेला नाही, अशी माहिती भिवंडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन सस्ते यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींवर अपहरण, लैंगिक छळ आणि पीटा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात आलेल्या वेश्याव्यवसाय चालिकेला न्यायालयात हजर करुन तिची रवानगी दि. 25 पर्यंत पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

Leave a Comment