पुणे (प्रतिनिधी) – भूजलाची पातळी वाढवण्यासाठी किंवा स्थिर राहण्यासाठी जलधर व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. जलधर अभ्यासामुळे भूजलामध्ये किती पाणी आहे याची माहिती मिळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे त्याठिकाणी कोणते पिक घ्यायचे, पाणी कुठे आणि कशाप्रकारे साठवायचे आदी व्यवस्थापन करणे सोपे जाते, अशी माहिती भूजल सर्वेक्षणमधील अधिकार्यांनी दिली.
जलधर व्यवस्थापन शेतीसाठी उपयुक्त
राज्यात दरवर्षी पाऊस कमी अधिक पडतो. त्यामुळे दरवर्षी भूजलाची पातळी कमी अधिक होते. राज्यात एक वर्ष ८०० मीमी पाऊस पडला तर दुसर्या वर्षी ४०० मीमी पाऊस पडतो. दरवर्षी पावसामध्ये मोठी तफावत असल्याने त्याचा परिणाम भूजलाच्या पातळीवर होतो. पावसाळ्यामध्ये भूजलाची पातळी वाढवण्यासाठी जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी कसे मुरेल याचा प्रयत्न केला जातो. पावसाळा संपल्यावर भूजलाची पातळी कमी होते. अशा परिस्थितीत शेतकरी विविध प्रकारची पिके घेतो. परंतु उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईला सामोरे जाऊ लागू नये, पिकाचे उत्पादन चांगले व्हावे यासाठी भूजलाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या जमिनीमध्ये जलधर अभ्यास करणे आवश्यकच आहे.
याबाबत भूजल सर्वेक्षणचे अधिकारी खंडाळे म्हणाले, शेतकर्यांना चांगले उत्पादन घेता यावे यासाठी भूजल विभागाच्या वतीने जालना येथील बदनापूर, बीड येथील आष्टी आणि सातारा येथील पुसेगाव या ठिकाणी जलधारण व्यवस्थापन उपक्रम राबवण्यात आला. खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे कडक उन्हाळा आणि माळरान आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच गावकर्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पुसेगावामध्ये जलधर अभ्यास करून भुजल पातळी किती आहे, त्या ठिकाणी रब्बी का खरीप उत्पादन घ्यायचे ही माहिती घेण्यात आली. त्यानुसार उन्हाळ्यामध्ये उसाच्या पिकापेक्षा कडधान्याचे पीक चांगले येईल हे सांगितल्यावर त्याठिकाणी कडधान्याच्या शेतीला सुरुवात झाली आणि पिक चांगले येऊ लागले.